‘ईथा’मधून साकारणार लावणी 'सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर'

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
मुंबई
Etha movie बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईथा’ या चित्रपटामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. हॉरर-कॉमेडी चित्रपटांमधील यशस्वी भूमिकांनंतर श्रद्धा आता एका वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असून ती महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
 

Shraddha Kapoor, Etha movie 
‘ईथा’ हा केवळ चरित्रपट नसून महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा गौरव करणारा चित्रपट म्हणून पाहिला जात आहे. या चित्रपटातून विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासातील संघर्ष, सामाजिक आव्हाने आणि कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे. त्यांच्या बालपणापासून ते लावणी आणि तमाशा क्षेत्रातील सर्वोच्च स्थानापर्यंतचा प्रवास चित्रपटात उलगडण्यात येणार आहे.
अत्यंत साध्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या विठाबाई यांनी लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. तमाशा आणि लावणीच्या मंचावर त्यांनी आपल्या नृत्यकौशल्य, प्रभावी अभिनय आणि दमदार आवाजाच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या सादरीकरणासाठी राज्यभरातून रसिकांची गर्दी होत असे. त्यांच्या असामान्य योगदानामुळे त्यांना ‘लावणी सम्राज्ञी’ ही मानाची उपाधी मिळाली.
त्या काळात तमाशा Etha movie  आणि लावणी कलाकारांकडे समाजाकडून अनेकदा कमीपणाने पाहिले जात असे. मात्र विठाबाई यांनी आपल्या प्रतिभा आणि कलेच्या जोरावर या पूर्वग्रहांना छेद दिला. त्यांनी लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देत समाजातील दृष्टीकोन बदलण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. अनेक संकटे आणि अडचणींवर मात करत त्यांनी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.चित्रपटातील भूमिका अधिक वास्तवदर्शी करण्यासाठी श्रद्धा कपूरने विशेष लावणी नृत्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना तिचा एक वेगळा, परिपक्व आणि कलात्मक अभिनय अनुभवता येणार असल्याची चर्चा आहे. ‘ईथा’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोककला वारशाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत असून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.