आरोपीला परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
- जिल्हा व सत्र न्यायालयाचा निरीक्षण : बारावीच्या परीक्षेसाठी आरोपी विद्यार्थ्याला जामीन

अनिल कांबळे
नागपूर, 
Student granted bail for exams आरोपी जरी गंभीर गुन्ह्यातील असला तरी तो विद्यार्थ्यी दशेत आहे. त्यामुळे फक्त परीक्षा काळासाठीच त्याला जामीन देता येईल. त्याला परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही, असे निरीक्षण जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने नोंदवत एका आरोपीला जामीन मंजूर केला. कृषक असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.
 
jamin
 
कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कृषक याला भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तो चुकीच्या संगतीने एका टोळीशी जुळला गेला. तो गुन्हेगारीत ओढल्या गेला. तो शिक्षण घेत असतानाच चुकीच्या मार्गाला लागल्यामुळे गुन्हेगारीकडे आकर्षित झाला. तो सध्या बारावीची परीक्षा देत आहे. ॲड. राजेंद्र साहू यांनी आरोपीच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली. बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र आणि परीक्षा वेळापत्रक न्यायालयात सादर करण्यात आले. परीक्षेमुळे त्याच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होऊ शकतो, तसेच शिक्षणाचा अधिकार लक्षात घेऊन न्यायालयाने मर्यादित कालावधीसाठी जामीन मंजूर केला. न्यालयाने कृषक याला २५ जून ते २७ जून २०२६ या कालावधींसाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. त्यासाठी ५० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तितक्याच रकमेचा एक सक्षम जामीनदार सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जामीन कालावधीत आरोपीने केवळ घरातून परीक्षा केंद्रावर जावे, कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क साधू नये, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करू नये तसेच दररोज दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान कोतवाली पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. परीक्षा संपल्यानंतर २७ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी नागपूर मध्यवर्ती कारागृहात हजर होण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द करण्यासाठी सरकार पक्षाला अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, हा आदेश केवळ बोर्ड परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी देण्यात आला असून तो प्रकरणाच्या गुणदोषांवर आधारित नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.