रोम,
Trump-Meloni clash flares up जी७ शिखर परिषदेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील वाद अधिकच तीव्र झाला आहे. ट्रम्प यांनी मेलोनी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांवरही परिणाम दिसू लागला आहे. वादाची ठिणगी तेव्हा पडली, जेव्हा ट्रम्प यांनी एका मुलाखतीत मेलोनी यांनी जी७ परिषदेदरम्यान स्वतःसोबत फोटो काढण्यासाठी आग्रह केल्याचा दावा केला. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे इटलीत संतापाची लाट उसळली. त्यांच्या वक्तव्याला अपमानास्पद आणि असत्य ठरवत मेलोनी यांनी थेट प्रत्युत्तर दिले.
मेलोनी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांचे सर्व दावे फेटाळून लावले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशा प्रकारची विधाने केवळ खोटीच नाहीत, तर मित्र राष्ट्रांबद्दलचा अपमानही आहेत. इटली कोणासमोरही झुकणार नाही, असा ठाम संदेशही त्यांनी दिला. या वादाचे पडसाद इटलीच्या परराष्ट्र धोरणावरही उमटले आहेत. इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो तायायांनी आपला नियोजित अमेरिका दौरा रद्द केला आहे. तसेच अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यासोबतची बैठकही रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अमेरिका-इटली संबंधांमध्ये नव्या तणावाची भर पडली आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी नंतरच्या मुलाखतीतही मेलोनींवर टीका कायम ठेवली. विशेषतः इराण संघर्ष आणि नाटो संदर्भातील भूमिकेवरून त्यांनी इटलीवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यामुळे दोन्ही नेत्यांमधील मतभेद अधिक उघड झाले आहेत. एकेकाळी ट्रम्प आणि मेलोनी हे पश्चिमेकडील राजकारणातील जवळचे सहकारी मानले जात होते. मात्र अलीकडील घडामोडींमुळे या संबंधांमध्ये स्पष्ट दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे. या वादाकडे आता आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.