उदयन ब्रह्म यांचे प्रतिपादन
प्रेमा खांडवे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
नागपूर,
Udayan Brahma धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात दु:खावर मात करण्यासाठी विनोद हीच प्रभावी मात्रा ठरते. विनोद माणसाला केवळ आनंदच देत नाही, तर जीवन जगण्याची सोशिकताही प्रदान करतो, असे मार्मिक प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उदयन ब्रह्म यांनी केले.
ज्येष्ठ लेखिका प्रेमा खांडवे यांच्या ‘शून्य सावली’ आणि ‘झिंग झिंग झिंगाट’ या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. साहित्य विहार संस्थेच्या सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम शुक्रवारी शंकरनगर येथील बाबूराव धनवटे सभागृहात उत्साहात पार पडला. उदयन ब्रह्म म्हणाले, जाणीव आणि नेणीव या दोन्ही स्तरांवर विनोद मनाला आनंद देतो. विनोदी लेखन करणाऱ्या महिलांची संख्या तुलनेने कमी असली, तरी विदर्भातील कथालेखिकांमध्ये प्रेमा खांडवे यांचे स्थान मानाचे आहे.
‘झिंग झिंग झिंगाट’ या विनोदी कथासंग्रहावर भाष्य करताना डॉ. सुरुची डबीर म्हणाल्या, दर्जेदार विनोद दुर्मिळ होत असताना प्रेमा खांडवे यांनी नर्मविनोदी शैलीत एक वेगळी धाटणी साकारली आहे. विनोदाच्या माध्यमातून सामाजिक भान जपत त्यांनी विविध प्रश्नांवर आशावादी दृष्टिकोनातून भाष्य केले आहे.
‘शून्य सावली’ या कथासंग्रहाविषयी बोलताना डॉ. विनीता हिंगे म्हणाल्या, या संग्रहात कथांचे तब्बल १८ विविध प्रकार हाताळण्यात आले असून प्रत्येक कथा अभ्यासपूर्ण आणि सूक्ष्म निरीक्षणातून आकाराला आली आहे. सामाजिक आशयाला लालित्यपूर्ण शैलीची जोड देत लेखिकेने मानवी मनोव्यापार प्रभावीपणे उलगडला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी वाघ यांनी केले. पुस्तकांना ब्लर्ब लिहिणाऱ्या जयश्री दाणी आणि डॉ. अरुंधती वैद्य यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उत्तरार्धात प्रेमा खांडवे यांनी आपल्या लेखन व पुस्तकनिर्मितीचा प्रवास उलगडला.