वर्धा,
NEET exam नीट पेपर फुटी प्रकरण चांगलेच गाजले. त्यामुळे परीक्षा रद्द करून आज रविवार २१ रोजी पुन्हा ही परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील ६ परीक्षा उपकेंद्रांवरून ही परीक्षा शांततेत पार पडली असून १४८ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. १ हजार ७०३ विद्यार्थी परीक्षेला हजर होते. या परीक्षेसंदर्भात प्रशासनाने प्रचंड गोपनियता पाळली.
नीट परीक्षा जिल्ह्यातील सहाही केंद्रांवरून शांततेत व पारदर्शक पद्धतीने व्हावी याकरिता प्रशासनाने सुक्ष्म नियोजन केले होते. प्रत्येक परीक्षा उपकेंद्रांवर एक नायब तहसीलदार व एक लिपीकाची नियुती करण्यात आली होती. दोन भरारी पथकातील अधिकार्यांनी परीक्षा सुरू असताना सहाही परीक्षा उपकेंद्रांना आकस्मिक भेटी देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यापूर्वी झालेल्या परीक्षेत अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर नीट पेपर फुटी प्रकरण देशात चांगलेच गाजले. परीक्षेच्या अनुषंगाने प्रभावी नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले होते. परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. विद्यार्थीही परीक्षेच्या एक तासापूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी केल्यावरच त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.