चीनचा ‘वॉटर बॉम्ब’ भारताचा 'मेगा प्लॅन'

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम
medog hydropower project चीनने तिबेटमध्ये यारलुंग त्सांगपो नदीच्या खालच्या प्रवाहात जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘मेडोग हायड्रोपॉवर प्रोजेक्ट’चे बांधकाम सुरू केल्याने दक्षिण आशियातील जलसुरक्षा आणि भू-राजकीय तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेला अवघ्या सुमारे ५० किलोमीटर अंतरावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प सुमारे ६०,००० मेगावाट क्षमतेचा असल्याचे सांगितले जात असून, त्याच्या प्रचंड आकारमानामुळे त्याला “वॉटर बॉम्ब” अशीही उपमा दिली जात आहे.
 

Medog Hydropower Project  
यारलुंग त्सांगपो नदी ही भारतात प्रवेश केल्यानंतर सियांग नदी म्हणून ओळखली जाते आणि पुढे ती ब्रह्मपुत्र नदीला मिळते. अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील कोट्यवधी लोकांसाठी ही नदी जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे चीनच्या या प्रकल्पामुळे नदीच्या प्रवाहावर, जलवितरणावर आणि संपूर्ण खोऱ्याच्या परिसंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तज्ज्ञांच्या मते, एवढ्या मोठ्या जलविद्युत प्रकल्पामुळे नदीच्या प्रवाहात बदल होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम स्थानिक परिसंस्थेवर, शेतीवर तसेच खालच्या भागातील जलसुरक्षेवर होऊ शकतो. अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारत या प्रकल्पावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे.
चीनच्या या हालचालींना medog hydropower project प्रत्युत्तर म्हणून भारताने अरुणाचल प्रदेशातील अपर सियांग आणि सियांग जिल्ह्यात सियांग अपर मल्टीपर्पज प्रोजेक्ट (SUMP) राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मार्फत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असून, तो पूर्ण झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुमारे १३ अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे १.५ लाख कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यातून सुमारे ४७ अब्ज युनिट वीज निर्मिती अपेक्षित आहे.सध्या चीनचा मेडोग प्रकल्प वेगाने पुढे सरकत असताना भारताचा SUMP प्रकल्प अजून अभ्यास आणि प्राथमिक व्यवहार्यता टप्प्यात असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. जमिनीवरील प्रत्यक्ष बांधकाम अद्याप सुरू झालेले नसले तरी, या प्रकल्पाला रणनीतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्व दिले जात आहे.
 
 
केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केले आहे की, ब्रह्मपुत्र खोऱ्यातील सर्व जलसंबंधित घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच खालच्या भागातील लोकांच्या उपजीविकेच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, SUMP प्रकल्प केवळ वीज निर्मितीसाठीच नव्हे तर पूर नियंत्रण आणि सीमावर्ती भागातील जलसुरक्षा मजबूत करण्यासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. ईशान्य भारतात पूराचा अंदाज वर्तवणारी प्रणाली, नदी निरीक्षण नेटवर्क आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भारताने भर दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या नव्हे तर भू-राजकीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.दरम्यान, चीनच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे आणि भारताच्या प्रत्युत्तरात्मक नियोजनामुळे ब्रह्मपुत्र खोऱ्यातील जलराजकारण अधिक गुंतागुंतीचे होण्याची चिन्हे दिसत आहेत.