अमरावतीत प्राणघातक हल्ला करून गोळीबार

-२० जणांवर गुन्हा, ७ अटकेत -आरोपींनी तलवारी हवेत फिरविल्या

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
अमरावती,
deadly-attack-and-shooting : शहरातील नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असोरिया पेट्रोल पंपसमोर जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. तसेच मारेकऱ्यांपैकी दोघाने गोळीबार केला. या प्रकरणी जखमी तरुणाच्या तक्रारीवरुन नागपूरी गेट पोलिसांनी २० जणांविरुध्द गुन्हा दाखल करुन सात जणांना रविवारी सकाळी अटक केली.
 
 
 
amt
 
 
 
सोहेब अहमद एजाज अहमद (३५, रा. मौलाना आझाद कॉलनी, अमरावती) असे हल्ल्यातील जखमी व तक्रारदारांचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी रविवारी सकाळपर्यंत सुफीयान बेग अन्वर बेग (२३, पठाण चौक), अरबाज खान अहफाज खान (२३, ताजनगर २), शेख मुन्नू शेख सलीम (३२, रतनगंज), वसीम खान शफि खान (४०), मो. सुफियान ऊर्फ गोलू मो. मन्नान (२४), सै. तैसिब सै. नासिर (२४) आणि शेख परवेजशेख सादीक (१९, चौघेही रा. अन्सार नगर) यांना अटक केली असून त्यांना २५ जूनपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. याचवेळी प्रकरणातील तेरा ते चौदा जण पसार असून नागपूरी गेट पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
 
 
सोहेब अहमदचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. २० जूनला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तो मोठा भाऊ अहेफाज आणि शेख रशीद यांच्यासोबत असोरिया पंपसमोरील एका पान टपरीजवळ उभे राहून बोलत होते. त्याच वेळी अचानक सहा ते सात दुचाकींवरून १६ ते १८ तरुण तिथे आले. जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी सय्यद तौसीफ सय्यद नासीर याने गाडीवरून उतरून सोहेबच्या दिशेने देशी कट्ट्याने थेट गोळी झाडली. सोहेब यावेळी स्वतःला वाचवण्यासाठी खाली वाकला, मात्र त्याच वेळी रहेमतउल्ला याने त्याच्या पाठीवर चाकूने जोरदार वार केले. यामुळे सोहेब जखमी होऊन त्याच्या पाठीतून रक्त वाहू लागले.
 
 
लगेच अरबाज नामक तरुणाने त्याच्याजवळील देशी कट्टा काढून हवेत गोळीबार केला. या जीवघेण्या हल्ल्यानंतर गाडीवरून उतरलेल्या इतर आरोपींनी तलवारी हवेत फिरवण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांच्या या कृत्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांनी घाबरून आपआपली दुकाने घाईघाईने बंद केली आणि लोक सैरावैरा पळू लागले. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहीती मिळताच पोलिस आयुक्तांसह मोठ्या प्रमाणात पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला होता.