समुद्रपूर,
Samudrapur farmer death, खरीपाचा हंगाम तोंडावर आला. शेतकर्यांची रासायनिक खते, बी-बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली. कित्येकांनी कपाशीची लागवडही केली. सिंचनाची सोय असलेल्या अनेकांनी लागवड सुद्धा सुरू केली, मात्र आपल्याकडे अद्यापही बी-बियाणे खरेदीसाठी पैसेच नाही. या विवंचनेतून आरंभा येथील शेतकर्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवार २० रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यत होत आहे.
रोशन यशवंत नक्षिणे (३२) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोशनचे वडील यशवंत नक्षिणे यांची आरंभा शिवारात १२ एकर शेती आहे. रोशन हा शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र, दरवर्षी अस्मानी संकटामुळे शेतातील उत्पन्न हाती येत नसल्याने त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. भारतीय स्टेट बँक निंभा शाखेतून २ लाख रुपये पीक कर्ज उचलले होते. मात्र, ते सुद्धा फेडता आले नाही. बचत गटाकडून १ लाख रुपये घेतले, खाजगी कर्जाचा सुद्धा डोंगर उभा राहिला. यावर्षी घराची दुरुस्ती केली त्यात सुद्धा पैसा लावला. सध्या शेतीचा हंगाम तोंडावर आल्याने त्याने अनेक कृषी केंद्रामध्ये बी-बियाणे खरेदीसाठी चकरा मारल्या. मात्र, त्याला उधारीवर बियाणे मिळाले नाही. आता बियाणेच नाही तर पेरायचे काय, या विवंचनेत रोशन होता.
दरम्यान, १९ जून रोजी सकाळी Samudrapur farmer death, हिंगणघाट येथे जातो म्हणून रोशन घरून निघून गेला. मात्र, रात्री उशिरापर्यंत परत आलाच नाही. २० रोजी सकाळी हिवरकर यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या नालीत तो मेंढपाळाला अत्यावस्थ अवस्थेत आढळून आला. त्याने विष प्राशन केल्याचे समजले. त्याला तात्काळ समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉटरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. त्याच्या मागे आई-वडील व दोन बहिणी असा आप्तपरिवार आहे. समुद्रपुर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.