‘तो’ बँक प्रतिनिधी ‘नॉट रिचेबल’!

- महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील फसवणूक प्रकरण

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
गोंदिया, 
fraud-case : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गोरेगाव येथे ग्राहकांच्या ठेवींशी संबंधित आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून बँकेच्या प्रतिनिधीमार्फत खात्यात जमा करण्यासाठी दिलेली रक्कम अनेक ग्राहकांच्या खात्यांमध्ये जमाच करण्यात आली नसल्याचे खातेदारांनी केलेल्या तक्रारीतून उघड झाले आहे. दरम्यान, हा प्रकार उघड होताच अनेक ग्राहकांनी त्या प्रतिनिधीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचे मोबाईल संपर्क क्षेत्राचे बाहेर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमासह संतापाची लाट उसळली आहे.
 
 
 
fraud
 
 
 
गोरेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे डेविड नान्हे रा. घोटी हा व्यक्ती बँक प्रतिनिधी म्हणून कार्यरत असताना ग्राहकांकडून खात्यात रक्कम जमा करण्यासाठी पैसे स्वीकारत होता. तर संबंधित ग्राहकांना रक्कम स्वीकारल्याची पावतीही देण्यात येत होती. मात्र, काही ग्राहकांनी बँकेत जाऊन पासबुक अद्ययावत केल्यावर त्यांच्या खात्यात संबंधित रक्कम जमा झाली नसल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकांनी बँकेचे शाखा व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार करून डेविड नान्हे याच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा संपर्कच होऊ शकला नाही. दरम्यान, काहींनी त्याच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली. यावेळी त्याच्या घराला कुलूप लागलेले असल्याची माहिती समोर आली.
 
 
तर त्याला स्थानिक बँक प्रशासनानेही त्याला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गोरेगावमध्ये हजारो ग्राहकांची खाती असून अनेक ग्राहक बँक प्रतिनिधीमार्फत व्यवहार करतात. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फसवणुकीची नेमकी रक्कम किती आहे, किती ग्राहक प्रभावित झाले आहेत आणि संबंधित प्रतिनिधीचा ठावठिकाणा काय आहे, असे अनेक प्रश्न आता ग्राहकांकडून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, ग्राहकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे बँक प्रशासनाकडूनही या घटनेची पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.