वैभवच्या फटक्याने, यश-विप्रजच्या कहराने श्रीलंका ढेपाळली

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ind-vs-sl : श्रीलंकेत झालेल्या त्रिराष्ट्रीय मालिकेच्या अंतिम सामन्यात भारत अ संघाने दमदार कामगिरी करत श्रीलंका अ संघावर 66 धावांनी शानदार विजय मिळवला आणि ट्राय सिरीजचे विजेतेपद पटकावले. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी, ज्याने अवघ्या 29 चेंडूत 94 धावांची तुफानी खेळी करत सामना एकतर्फी बनवला.
 
 
 
ind-vs-sl
 
 
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत भारत अ संघाने 50 षटकांत 9 बाद 377 धावांचा डोंगर उभा केला. डावाच्या सुरुवातीपासूनच वैभव सूर्यवंशीने श्रीलंकन गोलंदाजांवर आक्रमक हल्ला चढवला. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्याने केवळ 11 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत लिस्ट-अ क्रिकेटमध्ये नवा विक्रमही प्रस्थापित केला.
 
वैभव बाद झाल्यानंतर कर्णधार तिलक वर्मा याने संयमी 67 धावांची खेळी करत डाव सावरला. खालच्या फळीत अनुकूल रॉय याने 15 चेंडूत 39 धावांची तुफानी खेळी करून भारताची धावसंख्या 377 पर्यंत पोहोचवली.
 
378 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका अ संघाने झुंज देण्याचा प्रयत्न केला. सदीरा समरविक्रमा (52) आणि वानुजा सहान (62) यांनी प्रतिकार केला, मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांची झुंज अपुरी ठरली. भारताकडून यश ठाकूर याने 3 बळी घेतले, तर विप्रज निगम आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी 2 बळी घेत श्रीलंकेचा डाव 311 धावांवर संपवला.
 
काही दिवसांपूर्वी याच मालिकेत भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात सुपर ओव्हरपर्यंत रंगलेला वादग्रस्त सामना पाहायला मिळाला होता. त्या सामन्यातील तणावानंतर अंतिम लढतीत भारत अ संघाने दमदार पुनरागमन करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
 
या विजयासह भारत अ संघाने मालिकेतील चढ-उतारांवर मात करत त्रिराष्ट्रीय मालिकेची ट्रॉफी आपल्या नावावर केली. विशेषतः वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.