वाशीम,
International Yoga Day नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक जीवनदृष्टी विकसित होते. निरोगी व संतुलित जीवनासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त वतीने आयोजित जिल्हा क्रीडा संकुल येथे १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास तहसीलदार पळसकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, महाराष्ट्र सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष धनंजय वानखेडे, प्राचार्य संजय शिंदे, स्काऊट अँड गाईडचे पवार, महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. अनिल बोंडे, तालुका क्रीडा अधिकारी मंगला शेंडे, होमगार्ड इन्चार्ज इंगोले, योग मार्गदर्शक कुलदीप बदर, क्रीडा मार्गदर्शक अक्षय टेंभुर्णीकर, बोदडे , मोरे, तिडके, वैद्य, राष्ट्रीय खेळाडू अब्दुल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. योगाचार्य कुलदीप बदर यांनी विविध योगासने व प्राणायामाचे मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतः International Yoga Day योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांकडूनही योगाभ्यास करून घेतला. विशेष म्हणजे मंचावरील मान्यवरांनीदेखील योगसाधनेत सक्रिय सहभाग नोंदविला. प्रा. अनिल बोंडे, प्राचार्य संजय शिंदे, धनंजय वानखेडे आणि तालुका क्रीडा अधिकारी मंगला शेंडे यांनी मंचावर योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना प्रेरित केले. यावेळी योगप्रेमी, होमगार्ड जवान, क्रिकेट, कराटे, तायक्वांदो, बॉक्सिंग, अॅथलेटिक्स तसेच विविध खेळांचे खेळाडू, प्रशिक्षक, माता-भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व प्रशिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आरोग्य, तंदुरुस्ती आणि मानसिक शांततेचा संदेश देणारा हा योग दिन कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सहभागींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.