तभा वृत्तसेवा
पारवा,
illegal-liquor-sellers : पारवा पोलिस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या नेतृत्वात पोलिसांनी रविवार, 21 जून रोजी सकाळी किन्ही वन शेत शिवार भागात बेकायदेशीर हातभट्टीवर मोठी कारवाई केली. या धाडीत पोलिसांनी दारू तयार करण्याचे साहित्य, सडवा आणि गावठी दारूसह एकूण 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
किन्ही वन शेत शिवार परिसरात बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पारवा पोलिस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या सूचनेवरून पोलिस नाईक राहुल राठोड व पथकाने 21 जून रोजी सकाळी 8:45 ते 9:45 वाजताच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांना घटनास्थळावरून दारू तयार करण्याचे साहित्य, 15 लीटर क्षमतेचे 30 पिंप ज्यामध्ये सुमारे 45 हजार रुपये किमतीचा 450 लीटर मोहमाचा सडवा, तसेच 1 हजार रुपये किमतीची 10 लीटर गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 46 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
याप्रकरणी मिथुन आत्माराम आत्राम (वय 33) रा. किन्ही वन, ता. घाटंजी याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार सुरेश येलपुलवार करत आहेत.