अमरावती,
blunder-in-the-balbharati-textbook : क्रांतिसूर्य महात्मा ज्याेतिराव फुले आणि क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 राेजी पुणे येथील बुधवार पेठेतील ‘भिडे वाड्यात’ मुलींची पहिली शाळा सुरू करून देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ राेवली. हा इतिहास संपूर्ण जगाला माहित असून ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित आहे. परंतु, बालभारतीच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता तिसरीमधील ‘आपल्या सभाेवतालचे जग : भाग-2’ या पाठ्यपुस्तकात या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा’ असा संकुचित करण्यात आला आहे. वास्तविक पाहता, ही शाळा देशातील पहिली मुलींची शाळा आहे. बालभारतीची ही घाेडचूक तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी बालभारतीच्या संचालिका डाॅ. अनुराधा ओक यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
या संदर्भात प्रहार शिक्षक संघटनेने बालभारती प्रशासनाला पाठवलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत दस्तऐवज, राष्ट्रीय स्मारकांमधील नाेंदी आणि विविध प्रामाणिक संदर्भ ग्रंथांमध्ये या शाळेचा उल्लेख देशातील पहिली शाळा असाच आहे. पाठ्यपुस्तकातील या मर्यादित उल्लेखामुळे ऐतिहासिक सत्याचा संकाेच हाेत असून विद्यार्थ्यांपर्यंत चुकीचा इतिहास पाेहाेचत आहे. बालभारतीसारख्या अग्रगण्य संस्थेकडून राष्ट्रपुरुषांच्या महान कार्याबाबत अशी चूक हाेणे अत्यंत खेदजनक असून, यामुळे भावी पिढीमध्ये संभ्रम निर्माण हाेत आहे. या चुकीमुळे संपूर्ण राज्यातील शैक्षणिक वर्तुळात आणि समाजमनात तीव्र असंताेष पसरला आहे. ताबडताेब दुरूस्ती करावी, याबाबत बालभारतीने तातडीने एक अधिकृत शुद्धिपत्रक प्रसिद्ध करावे आणि भविष्यात पाठ्यपुस्तक निर्मिती करताना अशा गंभीर चुका टाळण्यासाठी संबंधित समितीला अधिक सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.