मालेगाव,
Malegaon youth murder case मालेगाव तालुक्यातील शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील सरहद्द पिंप्री गावाजवळील बळीराजा पेट्रोलपंपाजवळ जुन्या वादाच्या कारणावरून एका २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उकीरखेडा तालुका रिसोड येथील अभिषेक विष्णू वाघ (वय २४) याचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याचे वडील विष्णू गोविंदा वाघ (वय ४९) यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून आनंद विनोद मवाळ, प्रतीक संतोष हुंबाळ, पवन गजानन दांदडे तिघेही राहणार महागाव, तालुका रिसोड तसेच शुभम शेषराव अवचार राहणार अंजनी बुजुर्ग तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी पैशांच्या कारणावरून आरोपी आनंद मवाळ याचे वडील आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला होता. तसेच मागील महिनाभरापासून आनंद मवाळ हा अभिषेकला आपल्या वाहनावर काम करण्यासाठी येण्याचा आग्रह Malegaon youth murder case करीत होता. मात्र, अभिषेकने स्वतःकडे वाहन असल्याने नकार दिला होता. याच कारणावरून आरोपीने त्याला धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. १८ जून रोजी सायंकाळी ७ वाजतादरम्यान आरोपींनी अभिषेकला जेवणासाठी बाहेर जाण्याचे सांगून पिंपरी सरहद्द गावाजवळील बळीराजा पेट्रोलपंपाजवळ नेले. तेथे संगनमत करून जुन्या वादातून कोणत्यातरी जड हत्याराने त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस वार करून त्याची हत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. घटनेनंतर जखमी अभिषेकला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल व घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फिर्यादी मुलासोबत उपचारासाठी रुग्णालयात असल्याने तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार केशव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि इमरानखान पठाण करीत आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.