तभा वृत्तसेवा
मारेगाव,
massive-fire : तालुक्यातील कुंभा गावातील वस्तीत शुक्रवारी अचानक लागलेल्या आगीत तीन शेतकरी कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या आगीत गोठ्यासह शेती व गृहउपयोगी साहित्य जळून खाक झाले असून सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कुंभा येथील शेतकरी शंकर बेदूरकर व रघुनाथ बेदूरकर यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळांनी गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य, स्प्रिंकलर संच, चार ट्रॅक्टर कुटार, पाण्याची मोटार, तुरीचा साठा तसेच विविध गृहउपयोगी वस्तू भस्मसात केल्या. तर गोठ्या लगतच्या बबलू लढी यांच्या घरातील तूर व गृह उपयोगी साहित्य जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच गावातील युवक व नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाणी व इतर उपलब्ध साधनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. युवकांच्या धाडसी प्रयत्नांमुळे आग शेजारील घरांपर्यंत व इतर गोठ्यांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून महसूल प्रशासनाकडून पंचनामा करून नुकसानीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शासनाकडून तातडीची मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.