मोदींची बंगालमध्ये गर्जना!

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
कोलकाता,
modis thunderous call in bengal पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत राज्याच्या ऐतिहासिक आणि राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी बंगालच्या ओळखीच्या जतनासाठी त्यांच्या योगदानाला निर्णायक म्हटले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या फाळणीच्या काळात बंगाल अत्यंत संवेदनशील टप्प्यातून जात होता. त्या काळात अनेक गंभीर राजकीय निर्णय घेतले गेले आणि बंगालच्या भवितव्यावर त्याचा मोठा परिणाम झाला. अशा परिस्थितीत श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी ठाम भूमिका घेत बंगालच्या हितासाठी संघर्ष केल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले.
 
modi
 
काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात काही राजकीय पक्षांनी जनतेसमोर इतिहासाचे वेगळे चित्र मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्य कायम लपवता येत नाही, असे सांगत त्यांनी बंगालमध्ये आता नव्या बदलांची चाहूल लागल्याचे नमूद केले. पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या नव्या राजकीय वातावरणाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, राज्यात विकास, विश्वास आणि बदलाचे नवे चित्र दिसू लागले आहे. लोकशाही प्रक्रियेत जनतेच्या मतदानशक्तीमुळे मोठे परिवर्तन घडू शकते, याचे उदाहरण बंगालने दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
 
सीमावर्ती भागातील सुरक्षेच्या प्रश्नावरही मोदींनी भाष्य केले. भारत-बांगलादेश सीमेलगत सुरू असलेल्या कुंपण प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी पूर्वी या कामात अनेक अडथळे निर्माण झाले होते, असा आरोप केला. आता मात्र सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारकडून वेगाने पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्ला चढवला. सरकारी निधीचा गैरवापर आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठीच वापरला जाईल, अशी भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमातही सहभाग घेतला. हजारो नागरिकांसोबत योगाभ्यास करत त्यांनी निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. बंगाल दौऱ्यातील त्यांच्या या भेटीमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.