मुंबई
Nagabandham बहुचर्चित दाक्षिणात्य पॅन-इंडिया चित्रपट ‘नागबंधम’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मूळ तेलुगू भाषेत तयार करण्यात आलेला हा चित्रपट अॅक्शन, अॅडव्हेंचर आणि फँटसी या शैलींचा संगम असून, तो आता हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.
‘नागबंधम’ची कथा भारतातील प्राचीन विष्णू मंदिरांमध्ये प्रचलित असलेल्या गूढ ‘नागबंधम’ विधी आणि त्यासंबंधित दंतकथांवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. ट्रेलरमध्ये या रहस्यमय परंपरांचा आणि त्यामागील आध्यात्मिक तसेच ऐतिहासिक संदर्भांचा भव्यदिव्य आविष्कार दाखवण्यात आला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये दमदार अॅक्शन सीन्स, भव्य सेट्स आणि आधुनिक व्हीएफएक्सचा प्रभावी वापर पाहायला मिळतो.
ट्रेलरमधील काही संवादांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले असून, “जेव्हा अधर्म सर्व मर्यादा ओलांडतो, तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी दैवी शक्ती प्रकट होते,” अशा आशयाचे संवाद चित्रपटाच्या कथानकाला पौराणिक गूढतेचा गडद स्पर्श देतात. कोणताही मोठा सुपरस्टार नसतानाही, प्रभावी सादरीकरण आणि दिग्दर्शनामुळे ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.याआधी फेब्रुवारी महिन्यात या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये पद्मनाभस्वामी मंदिर आणि पुरी जगन्नाथ मंदिर यांसारख्या प्राचीन देवस्थानांशी संबंधित नागबंधमच्या रहस्यांची झलक दाखवण्यात आली होती. ट्रेलरमध्ये अभिनेते महेश मांजरेकर यांच्या भूमिकेनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून Nagabandham घेतले आहे.‘नागबंधम’मध्ये विराट कर्ण आणि नभा नितेश मुख्य भूमिकेत दिसणार असून, ऐश्वर्य मेनन, दक्षा नगरकर, महेश मांजरेकर, जगपती बाबू आणि मुरली शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक नामा यांनी केले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पौराणिक आणि काल्पनिक कथांवर आधारित चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, ‘हनुमान’, ‘कार्तिकेय’ आणि ‘कार्तिकेय 2’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांच्या पंक्तीत ‘नागबंधम’चीही गणना होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा चित्रपट येत्या 3 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.