अत्याचार, ब्लॅकमेलिंग, खंडणी आणि धर्मांतर प्रकरणाचा तपास वेगात

पीडित महिलेची ओळख अय्याजने पत्नी म्हणून करून दिली मौलानाचा दावा

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Nagpur Rape Case  मुख्य आरोपी अय्याज मदारे याने पीडित महिलेची ओळख स्वतःची पत्नी म्हणून करून दिली होती. तसेच ती महिला बुरखा परिधान करून असल्याने आपल्याला कोणताही संशय आला नाही, असा दावा सैनिकाच्या पत्नीवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या हजरत मौलानाने चौकशीदरम्यान केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, पोलिसांनी मौलानाच्या या दाव्यावर संशय व्यक्त केला असून त्याच्या जबाबातील विसंगतींची कसून पडताळणी सुरू केली आहे. चौकशीतून स्वतःची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न मौलाना करीत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
 

Nagpur Rape Case 
या प्रकरणात सोनेगाव पोलिसांनी हजरत मौलानाला अटक करून १८ जून रोजी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती. सध्या मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे (२६) आणि त्याचा साथीदार अमीन शेख (३०) यांच्यासह मौलानाची चौकशी सुरू आहे. दरम्यान, तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी २१ जून रोजी संपत असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावली जाण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
 
पोलिसांच्या माहितीनुसार, Nagpur Rape Case  तक्रारदार महिला ही भारतीय वायुदलातील जवानाची पत्नी असून नागपुरात प्रॉपर्टी डिलिंगचे काम करते. डिसेंबर २०२४ मध्ये तिचा संपर्क तिचा वर्गमित्र असलेल्या अय्याज मदारेशी इन्स्टाग्रामद्वारे झाला होता. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रॉपर्टी व्यवहाराच्या बहाण्याने अय्याजने तिला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावल्याचा आरोप आहे. आरोपीने दिलेले पेय घेतल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले होते. व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि पतीला दाखविण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर वारंवार शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकला. तसेच रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे सुमारे ३.०९ लाख रुपये उकळल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
 
 
तक्रारीनुसार, ३१ मे २०२५ रोजी पीडितेला मध्य प्रदेशातील तामिया येथे नेण्यात आले. तेथे अटक करण्यात आलेल्या मौलानाच्या उपस्थितीत तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. बलात्कार, ब्लॅकमेलिंग, खंडणी व जबरदस्ती धर्मांतराच्या आरोपांच्या अनुषंगाने पोलिसांकडून घटनाक्रमाची सखोल चौकशी सुरू आहे.