यवतमाळातील 13 केंद्रांवर पार पडली नीटची ‘परिक्षा’

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
neet-exam : यवतमाळीतील 13 केंद्रावर रविवार, 21 जून रोजी दुपारी 2 ते 5.15 या वेळात नीटची परिक्षा घेण्यात आली. ही परिक्षा 2 हजार 847 विद्यार्थ्यांचे भविष्य ठरविणार आहे. फेरपरीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. यासाठी यंत्रणा अलर्ट मोडमध्ये होत्या, प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला.
 
 
 
y21Jun-NEET
 
 
 
राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा नीट निमित्त शहरातील परीक्षा केंद्रांबाहेर परीक्षार्थींसोबत आलेल्या पालक व नागरिकांसाठी वहदत-ए-इस्लामी हिंद, शाखा यवतमाळ यांच्या वतीने शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
 
 
जून महिन्यातील कडक उन्हात ग्रामीण व दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे पालक परीक्षा केंद्राबाहेर तासंतास थांबत असल्याने त्यांच्या सोयीसाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शहरातील अमोलकचंद महाविद्यालय, अँग्लो हिंदी हायस्कूल व देवराव पाटील विद्यालयासह एकूण तीन परीक्षा केंद्रांबाहेर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
 
 
या उपक्रमामुळे परीक्षार्थींचे पालक, नागरिक तसेच उपस्थितांनी समाधान व्यक्त करत वहदत-ए-इस्लामीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शेख मुजीब, फसीउल्लाह खान, अली इम्रान, निसार फारुकी, शकील अहमद, अकिल खान, डॉ. साजिद पटेल यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.