पेपरपेक्षा तणावच ठरला मोठा प्रतिस्पर्धी

- "नीट" फेरपरीक्षा सुरळीत - अब्दुल्लाची जिद्द ठरली चर्चेचा विषय

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
neet-ug-re-examination : पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर देशभराचे लक्ष लागलेल्या नीट-यूजी फेरपरीक्षेत नागपुराने सुरक्षा, शिस्त आणि संवेदनशीलतेचा समतोल अनुभवला. एकीकडे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत परीक्षा सुरळीत पार पडली, तर दुसरीकडे अबुधाबीऐवजी अखेर नागपुरात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबातील भावनिक क्षण आणि प्रश्नपत्रिकेच्या कठीणतेबाबत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरल्या. जिल्ह्यातील ३० केंद्रांवर एकूण १२ हजार ५१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
 
 

neet 
 
 
बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था
 
 
परीक्षेची गोपनीयता कायम ठेवण्यासाठी १४ केंद्रांवर सीआरपीएफ व पोलीस, तर १६ केंद्रांवर सीआयएसएफ व स्थानिक पोलिसांचा संयुक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रश्नपत्रिका वायुसेनेच्या विशेष विमानातून आणून सुरक्षित कक्षात ठेवण्यात आल्या. केंद्रांवर सीसीटीव्ही, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देखरेख, बायोमेट्रिक पडताळणी, मेटल डिटेक्टर, जॅमर आणि वैद्यकीय तपासणीद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
 
 केंद्रांबाहेर पालकांची प्रतीक्षा
 
 
सकाळपासूनच सर्व परीक्षा केंद्रांबाहेर विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी होती. परीक्षार्थींच्या सोयीसाठी थंड पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि परीक्षा कक्षांमध्ये पुरेसे पंखे उपलब्ध करून देण्यात आले. प्रवासासाठी महानगरपालिकेच्या मोफत ‘आपली बस’ सेवेचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. काही केंद्रांवर पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली होती.
 
अब्दुल्लाच्या संघर्षाने वेधले लक्ष
 
 
सुरुवातीला अबुधाबी येथे परीक्षा केंद्र मिळाल्याने चर्चेत आलेल्या अब्दुल्ला मोहम्मद तालिबला एनटीएने अखेर नागपूरमध्येच परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी मुलाला पाहून त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. गेल्या काही दिवसांतील मानसिक तणावामुळे मुलाच्या तयारीवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 
उशिरा आल्याने प्रवेश नाकारला
 
श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर काही मिनिटे उशिरा पोहोचलेल्या दोन विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला. वेळेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली.
 
कठीण प्रश्नपत्रिकेची चर्चा
 
 
विद्यार्थ्यांच्या मते, जीवशास्त्राचा पेपर तुलनेने सोपा होता; मात्र रसायनशास्त्रातील प्रश्न अधिक कठीण, तर भौतिकशास्त्राचा पेपर वेळखाऊ ठरला. अनेकांनी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका मूळ परीक्षेपेक्षा अधिक अवघड असल्याचे सांगितले.
 
मानसिक तणावाचा परिणाम
 
 
पेपरफुटीनंतरच्या अनिश्चिततेमुळे तयारीवर परिणाम झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. काहींनी कठीण प्रश्नांमुळे तणाव वाढल्याचे, तर पालकांनी पुनर्परीक्षेमुळे मुलांवर अनावश्यक मानसिक दडपण आल्याचे मत व्यक्त केले. मात्र परीक्षा केंद्रांवरील सुविधा आणि प्रशासनाच्या नियोजनाबाबत विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.
 
परीक्षा केंद्रावरील व्यवस्था
 
 
"श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात ३८४ विद्यार्थ्यांपैकी ३४७ विद्यार्थी उपस्थित होते, तर ३६ अनुपस्थित राहिले. १६ वर्गांमध्ये प्रत्येकी २४ विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही आणि जॅमर बसविण्यात आले होते. गेटवर फेस रेकग्निशनसह बायोमेट्रिक पडताळणी करण्यात आली. परीक्षेच्या ४५ मिनिटांपूर्वी निरीक्षक, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी आणि पोलिसांच्या उपस्थितीत प्रश्नपत्रिकेचा बॉक्स उघडून प्रत्येक वर्गात प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आल्या."
 
- डॉ. जागेश्वर केचे, परीक्षा केंद्र प्रमुख