वाराणसी,
varanasi mosque dispute वाराणसीतील गंज शहीदान मशीद प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय रंग चढताना दिसत आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी सोशल मीडियावर या विषयावर प्रतिक्रिया दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वाराणसीसह देशभरातील राजकीय आणि धार्मिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
झरदारी यांनी आपल्या पोस्टमध्ये वाराणसीतील गंज शहीदान मशीद आणि इतर ऐतिहासिक धार्मिक स्थळांबाबत चिंता व्यक्त करत धार्मिक वारशाच्या संरक्षणाची गरज अधोरेखित केली. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर भारतातील मुस्लिम धर्मगुरूंनीच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काशीतील मुस्लिम धर्मगुरूंनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा भारताचा अंतर्गत विषय असून पाकिस्तानने त्यात हस्तक्षेप करू नये. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून सर्व पक्षांना भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानने प्रथम स्वतःच्या देशातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा टोला देखील धर्मगुरूंनी लगावला.
दरम्यान, गंज शहीदान मशीद प्रकरण सध्या न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे. रेल्वे प्रशासनाच्या मते, संबंधित मशीद रेल्वेच्या जमिनीवर उभारण्यात आली असून स्टेशनच्या विकासकामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नोटीस बजावत प्रशासनाने पुढील कारवाईची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, मशिदीशी संबंधित समितीने प्रशासनाचा दावा फेटाळून लावत ही मशीद शेकडो वर्षे जुनी असल्याचा दावा केला आहे. ऐतिहासिक नकाशे आणि दस्तऐवजांच्या आधारे मशिदीचे अस्तित्व सिद्ध होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे हा वाद अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.
या प्र
करणात सोशल मीडियावर वाढत्या चर्चेमुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. वाराणसी पोलिसांनी सोशल मीडियावरील पोस्ट आणि प्रतिक्रियांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. एकूणच, वाराणसीतील मशीद वाद आता केवळ स्थानिक प्रश्न राहिलेला नसून त्याचे पडसाद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटताना दिसत आहेत. पुढील न्यायालयीन निर्णय आणि प्रशासनाची भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.