पोंभूर्णा,
Pombhurna tiger death मध्य चांदा वनविभागांतर्गत येणार्या पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील पिंपरी दीक्षित नियतक्षेत्रात शनिवारी सकाळच्या सुमारास एका वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
वनकर्मचारी नियमित गस्तीवर असताना, संरक्षित वनकक्ष क्रमांक 543 मधील तलाव परिसरातील बेशरमच्या दाट झुडपांमध्ये हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. या बाबत कळताच मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक योगेश वाघाये, उपविभागीय वनाधिकारी मंगेश गिरडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत राखुंडे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (एनटीसीए) प्रतिनिधी राजू काहीलकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी मुकेश भांदककर घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार, डॉ. नरसिंग तेलंगे, डॉ. यशोदिप कांबळे यांनीही घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. अधिकार्यांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिकारीचा किंवा अवयव तस्करीचा प्रकार असण्याची शक्यता प्रथमदर्शनी फेटाळली गेली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले व त्यानंतर नियमानुसार मृतदेहावर दहन संस्कार करण्यात आले.
वनविभागाने दिलेल्या प्राथमिक Pombhurna tiger death माहितीनुसार, या वाघाने 12 जून रोजी परिसरातील सहा म्हशींवर हल्ला केला होता. या हिंस्त्र लढाईत म्हशी गंभीर जखमी झाल्या होत्या, मात्र त्याच वेळी झालेल्या प्रतिहल्ल्यात वाघालाही अंतर्गत किंवा गंभीर दुखापत झाली असावी, असा अंदाज आहे. या जखमांमुळेच वाघाचा मृत्यू झाला असावा, असे बोलले जात आहे. मात्र, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.