जायचे ते खुशाल गेले…, पुढे काय?

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
रोखठोक
दिनेश गुणे
Uddhav Thackeray काही म्हणी किंवा वाक्प्रचार ही जीवनशैलीची अनुभवसिद्ध उदाहरणे असतात. शुक्रवारी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रसंग ज्यांनी पाहिला आणि ऐकला, त्यांना या वाक्प्रचाराच्या पुनरावृत्तीचा प्रत्यय निश्चितच आला असेल. १९ जून १९६६ या दिवशी, महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या हीरक महोत्सवी वर्धापनदिनाचे दोन सोहळे शुक्रवारी, १९ जून २०२६ या दिवशी मुंबईत स्वतंत्रपणे साजरे झाले आणि बाळासाहेबांच्या हयातीतील शिवसेनेच्या इतिहासातील काही प्रसंगांची पुनरावृत्ती झाल्याचा प्रत्यय अनेकांस आला. मराठीत ‘खुंटा हलवून बळकट करणे’ असा एक वाक्प्रचार आहे. आपल्या अस्तित्वाचे अढळपद अधोरेखित करण्यासाठी किंवा आपल्या अस्तित्वाचे महत्त्व ओळखण्यासाठी काही वेळा जी कृती केली जाते, त्यासाठी हा वाक्प्रचार वापरला जातो. शिवसेनेच्या इतिहासात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काही वेळा याच कृतीचा वापर केला, पण त्या प्रत्येक वेळी त्यांच्या अस्तित्वाचे अढळपद अधिक ठळकपणे अधोरेखित झाले होते. शुक्रवारी मुंबईच्या षण्मुखानद सभागृहात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आयोजित केलेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या त्याच कृतीची पुनरावृत्ती केली, पण त्यामध्ये आपल्या अस्तित्वाचे अढळपद अधोरेखित करण्याचा प्रयत्न कोठेच दिसला नाही. उलट, आपल्या अस्तित्वाचे महत्त्व जाणून घेण्याचा तो प्रयत्न असावा असेच अनेकांस वाटले असेल. बाळासाहेब ठाकरे यांनीही काही प्रसगांमुळे व्यथित होऊन शिवसेनाप्रमुखपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. उद्धव ठाकरे यांनी तसे केले नाही, पण पद सोडण्याची तयारी दाखवून खुंटा हलवून बळकट आहे किंवा नाही याची चाचपणी मात्र निश्चितच केली.
 
 
Uddhav Thackeray
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ते शिवसेना उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे अशा वाटचालीतील या पुनरावृत्तीचा इतिहास जाणून घेण्यासाठी सुमारे पाच दशके मागे जावे लागेल. नोव्हेंबर १९७८ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या ११७ उमेदवारांपैकी केवळ २१ उमेदवार विजयी झाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच झालेल्या या दारुण पराभवामुळे बाळासाहेब व्यथित झाले आणि शिवाजी पार्क मैदानावरील लाखोंच्या जाहीर सभेत त्यांनी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ‘आमुचा रामराम घ्यावा’, अशा मथळ्याचा अग्रलेख ‘मार्मिक’ साप्ताहिकात लिहून आपल्या निर्णयामागील भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. तेव्हा ‘मार्मिक’मधील प्रत्येक शब्दाकडे महाराष्ट्रात गांभीर्याने पाहिले जायचे. कारण त्यामध्ये प्रसिद्ध होणारे शब्द आणि प्रत्येक व्यंगचित्र केवळ विनोदी किंवा टोमणे नव्हते. बाळासाहेबांच्या विचारातून आणि कुंचल्यातून उतरलेल्या शब्दांनी आणि व्यंगचित्रांनी राजकारणाला चिमटे आणि बोचरे बोचकारे काढले. राजकारणातील व्यंगावर नेमके बोट ठेवत शब्दांचे आणि रेषांचे आसूड ओढले आणि समाजाला जागे करण्यासाठी प्रसंगी शब्दांचे फटकारेही मारले. त्यामुळे बाळासाहेबांनी स्वतःच शिवसेनाप्रमुखपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शिवसेनेत अक्षरशः हाहाकार माजला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनचा भगवा महापालिकेवर फडकला नाही तर आपण शिवसेना प्रमुखपदावरून दूर होऊ, असे त्यांनी त्याआधीच्या दसरा मेळाव्यात जाहीर केले होते. आयुष्यात आपण शब्दांची कदर करत असल्यामुळे ती प्रतिज्ञा करताना आपला विवेक शाबूत ठेवला होता, त्यामुळे निवडणुकीतील २१ जागांवरील विजय हा हुरळून जाण्यासारखा नसल्याने शब्दाला जागून आपण राजीनाम्याचा निर्णय घेतला, असे बाळासाहेबांनी स्पष्ट केले आणि शिवसैनिकांना भावनावेग अनावर झाला. त्या निर्णयानंतर शिवाजी पार्कवरील त्या सभेत एखादी वावटळ उठावी त्या त्वेषाने असंख्य श्रोते उभे राहिले. अनेक जण व्यासपीठाच्या दिशेने धावले आणि अनेकांनी व्यासपीठाला वेढा घालून गगनभेदी घोषणा देत बाळासाहेबांच्या निर्णयास विरोध सुरू केला. अनेकांना तर रडू अनावर झाले आणि ‘आपला निर्णय आपल्या हातात नाही’, याची जाणीव बाळासाहेबांना झाली. ‘राजीनाम्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर केवळ शाब्दिक कसरती करून तो फिरविण्याचा नादानपणा मला करायचा नव्हता, म्हणून अट्टहासाने शब्दाला जागून शिवतीर्थावर मराठी माणसाच्या चरणी आम्ही आमचा राजीनामा सादर केला, पण आपला निर्णय घेणेदेखील आपल्याला शक्य राहिलेले नाही असे लक्षात आल्याने लोकांच्या भावनेची कदर करून राजीनामा मागे घेतला’, असे बाळासाहेबांनी त्या लेखात नमूद केले होते.
 
 
शिवसेनेच्या इतिहासातील प्रमुखपदाचा त्याग करण्याचा हा प्रसंग केवळ खुंटी हलवून बळकट करण्याचा किंवा आपल्या अढळपदाचा अबाधितपणा अनुभवण्याचा प्रयोग नव्हता, हे तेव्हा बाळासाहेबांच्या लाखो अनुयायांनीच सिद्ध करून दाखविले होते. बाळासाहेबांच्या नेतृत्वावरील शिवसैनिकांची अढळ श्रद्धा या प्रसंगाने अधोरेखित झाली आणि त्यांचे नेतृत्व तेजाळले. असे आणखीही काही प्रसंग बाळासाहेबांच्या नेतृत्वकाळात घडले. १९९२ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेचा त्याग केला. शिवसेनेच्या इतिहासातील बंडखोरीचा हा सर्वांत मोठा, पहिला प्रसंग ठरला. त्याआधी हेमचंद्र गुप्ते यांनी पक्ष सोडला होता, पण ती फूट ठरली नव्हती. छगन भुजबळ यांच्या पक्षत्यागामुळे दुखावलेल्या बाळासाहेबांनी जुलै १९९२ मध्ये शिवसेनाप्रमुखपद सोडण्याची घोषणा केली. महाराष्ट्रात सर्वत्र शिवसैनिक रस्त्यावर उतरले. बाळासाहेबांना त्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने झालीत आणि ‘बाळासाहेबांशिवाय शिवसेना नाहीच’ अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्यावर पुन्हा बाळासाहेबांनी आपला निर्णय मागे घेतला. बाळासाहेबांचे नेतृत्व आणि पक्षावरील पकड निर्विवादपणे मजबूत झाली आणि नेतृत्वावरील भावनिक निष्ठा हा पुढे शिवसेनेचा मुख्य आधार ठरला. पक्षाच्या दृष्टीने ही एक जमेची बाजू असली, तरी अशाच प्रसंगांतून, नेतृत्वाभोवतीची व्यक्तिपूजनाची संस्कृतीदेखील विकसित झाली आणि नवे नेतृत्व विकसित होण्याच्या शक्यतादेखील संपुष्टात आल्या, हेदेखील याच इतिहासाने दाखवून दिले. पुढे नेतृत्वाच्या मुद्यावरूनच शिवसेनेत उफाळलेल्या वादामुळे व्यथित झालेल्या बाळासाहेबांना नेतृत्वाचे हस्तांतरण करण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा शिवसेनेचा अत्यंत संवेदनशील काळ ठरला, पण त्यातून संघटनेत उत्तराधिकाराची प्रक्रिया सुरू झाली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वास अधिकृत रूप प्राप्त झाले. बाळासाहेबांनी राजीनामा किंवा पदत्याग हा शब्द अनेकदा संघटनात्मक शस्त्र म्हणून वापरल्याचे दिसते. परंतु तो केवळ सत्तेचा खेळ नव्हता, तर कार्यकर्त्यांच्या निष्ठेची चाचणी आणि पक्षसंघटन भावनिक धाग्याने बांधून पुन्हा एकत्र आणण्याचा व संघटना बळकट ठरण्याचे साधन ठरला होता. शिवसेनाप्रमुखपद सोडण्याचा निर्णय त्यांनी जेव्हा जेव्हा जाहीर केला किंवा बोलून दाखविला, त्या प्रत्येक वेळी त्यांचे नेतृत्व निर्विवाद ठरले आणि ‘शिवसेना म्हणजे बाळासाहेब आणि बाळासाहेब म्हणजे शिवसेना’ ही भावना अधिक बळकट होत गेली.
 
 
या प्रथेची पुनरावृत्ती पुढे अनेकदा Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातही झालेली दिसते. माझे नेतृत्व मान्य नसेल तर सांगा, मी दूर होतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही अनेकदा याच भावनिक शस्त्राचा वापर केला होता, पण त्यामागचे कारण वेगळे होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्हे उमटवूनच पुढे पहिल्या फळीतील काही नेत्यांनी शिवसेना सोडली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही, हे अनेक नेत्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखविले होते. जेव्हा जेव्हा शिवसेनेत अशी फूट पडली, तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या प्रयोगाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला होता, पण बाळासाहेबांसारखा प्रचंड भावनिक पाठिंबा त्यांच्या वाट्याला आलाच नाही. अनेकांनी नेतृत्वावर प्रश्नचिन्हे उमटवायची आणि मूठभरांनी निष्ठेचे प्रदर्शन करत पाठिंबा व्यक्त करायचा असेच अशा प्रसंगांतून दिसत राहिले. थोडक्यात, बाळासाहेबांच्या या शैलीचा पक्षावरील प्रभाव संपुष्टात आल्यानंतरही उद्धव ठाकरे पुन्हा पुन्हा त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करत राहिले. बाळासाहेबांच्या या शैलीमुळे खरे तर, पक्षाची वैचारिक व संघटनात्मक ताकद नेतृत्वाच्या व्यक्तिमत्त्वावरच अवलंबून राहिली होती. त्यामुळे बाळासाहेबांच्या पश्चात उत्तराधिकाराचे आणि नेतृत्वाचे प्रश्न तीव्र स्वरूपात समोर येत राहिले. राज ठाकरे यांचा पक्षत्याग, त्यानंतरचे वेगवेगळे बंडखोरीचे प्रसंग आणि अखेरीस एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वशैलीच्या भविष्यावरच उमटलेले प्रश्नचिन्ह या सर्वांची बीजे काही प्रमाणात संघटनेच्या नेतृत्वकेंद्रित रचनेत शोधता येतात. पदत्यागाचे इशारे म्हणजे आपल्या नेतृत्वाचा अढळपणा अबाधित राखण्याचे प्रयत्न असा एक वेगळाच अर्थ त्यामागे दडल्याची भावना निर्माण होऊ लागली. बाळासाहेबांच्या पदत्यागाच्या घोषणांनी अल्पकालीन संघटनात्मक एकजूट वाढविली, पण कदाचित त्यामुळेच संघटनेतील संस्थात्मक नेतृत्वनिर्मितीच्या प्रक्रियेला मर्यादा आल्या असाव्यात. त्यामुळे, ही शैली दीर्घ कालाकरिता प्रभावी राहिलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात त्याचा वापर केला, तेव्हा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणाऱ्या निष्ठावंतांनी त्यास विरोध जरूर केला, पण साठ वर्षांच्या वाटचालीपैकी गेल्या २३ वर्षांत शिवसेनेबाहेर जाणाऱ्यांच्या प्रवाहाचा जोरदार वेग रोखण्याऐवजी धरणाचे दरवाजे उघडून प्रवाहास बाहेरची वाट करून देण्याचेच धोरण अधिक प्रभावीपणे राबविले गेले. २००३ मध्ये शिवसेनेच्या महाबळेश्वर शिबिरात संघटनेमध्ये कार्यकारी प्रमुखपद निर्माण करण्यात आले आणि लगोलग उद्धव ठाकरे यांची या पदावर एकमताने निवड करण्यात आली. त्याआधीच्या वर्षात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात ‘चालते व्हा’ आंदोलन गाजविले होते. २००५ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने कामाला जोरदार सुरुवात केली आणि त्याच वर्षी नारायण राणे यांनाच ‘पक्षातून चालते व्हा’ असा आदेश देण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत राणे शिवसेनेतून बाहेर पडले आणि संघटनेच्या गळतीला सुरुवात झाली. २००६ मध्ये राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानंतर जेव्हा जेव्हा पक्षात फूट पडली, बाळासाहबांचे निष्ठावंत कार्यकर्तेदेखील पक्षाला सोडचिठ्ठी देऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करू लागले, तेव्हा तेव्हा, ‘जाणाऱ्यांनी खुशाल जावे’ असाच पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे दिसते. शिवसेनेसमोरील संकटाचा सामना करण्यासाठी आपण पहाडासारखे एकटेच उभे राहू, हा उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास हेच त्याचे कारण असावे.
 
 
महाराष्ट्राने शिवसेनेला मनापासून साथ दिली होती. स्वबळावर राज्याची सत्ता मिळाली नाही, तरी मंत्रालयावर भगवा फडकावण्याच्या बाळासाहेबांच्या स्वप्नास १९९५ मध्ये महाराष्ट्रातील जनतेने साथ दिली होती. शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती आहे आणि ती काही निश्चित विचारांशी बांधील आहे, हे युतीचे सूत्र जनतेनेही मान्य केले होते. त्यामुळेच, युती म्हणून लढविलेल्या सर्व निवडणुकांतील शिवसेना आणि भाजपचे यश महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकून राहिले होते. अगोदरच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आक्षेप असलेल्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा सपाटा लावल्याने कमकुवत होत गेलेला शिवसेनेचा तंबू, २०१९ मधील निवडणुकीनंतर बदललेल्या राजकारणामुळे अधिकच डळमळीत झाला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या निर्णयास वैधानिकदृष्ट्या नाकारता येत नसले, तरी महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या राजकारणावर नैतिकदृष्ट्या काही प्रश्नचिन्हे उमटलीच होती. ठाकरे यांच्या या निर्णयामुळेच शिवसेनेतील बाळासाहेबांच्या निष्ठावंतांच्या जाणिवा दुखावल्याचे वारंवार स्पष्टदेखील होत गेले आहे. आज महाराष्ट्रात जनतेने दिलेला कौल पाहता, बाळासाहेबांच्या शिवसेनेवरील ठाकरे परिवाराचे वर्चस्व जवळपास संपुष्टात आल्यासारखी स्थिती दिसते. शुक्रवारी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत शिवसेनेचा वर्धापनदिन मुंबईत साजरा झाला, तेव्हा एका बाजूला पक्षाचा जुना दमदार आवाज उमटत होता, तर दुसरीकडे मात्र, उद्विग्न आणि अपयशाची खंत उमटताना दिसत होती. आता ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हा केवळ एका गटापुरता मूठभर उरला आहे. तो पुन्हा उभा करण्याचे आव्हान सोपे नाही. बाळासाहेबांचा करिष्मा असेपर्यंतच शिवसेनेवर उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व राहील आणि तोपर्यंतच त्यांचे नेतृत्व अबाधित राहील, त्यानंतर मात्र काळासोबत त्यांचा प्रभाव कमी होत जाईल, असे भाकीत सुमारे दोन दशकांपूर्वी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे यांनी वर्तविले होते. बाळासाहेबांचा प्रभाव असलेला मोठा वर्ग आता ठाकरेंच्या गटापासून दुरावला आहे. बाळासाहेबांनी आपल्या झंझावाती प्रचारशैलीने आणि आक्रमक विचारांनी त्यांच्या काळातील तरुणांची मने जिंकली होती. ती पिढी आता जुनी झाली. आताच्या तरुणांवर बाळासाहेबांसारखा प्रभाव टाकणारे नेतृत्व ठाकरे गटाकडे नाही, हे वास्तव आहे. कालपरवा केवळ आभासी मंचावर स्थापन झालेल्या झुरळ जनता पार्टीने देशातील तरुणाईला आकर्षित करून राजकारणास त्यांची दखल घेणे भाग पाडले होते. ठाकरे गटाच्या नेत्यांसमोर तेदेखील एक मोठे आव्हान आहे. केवळ ‘जायचे त्यांनी खुशाल जावे’ ही ठाकरेंच्या राजकारणाची नीती असताना, दुसरीकडे मात्र, अन्य राजकीय पक्षांत दाखल होणाऱ्यांसाठी पायघड्या घातल्या जात आहेत. बेरजेला महत्त्व असलेल्या जमान्यात वजाबाकीचे राजकारण कितपत यशस्वी होईल यावर ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. कारण त्यांच्या पक्षाचे दरवाजे उघडे असले, तरी त्यातून बाहेर पडण्याचीच मुभा दिली गेली आहे.