उमरखेड,
Umarkhed Power Supply उमरखेड शहर व महागाव तालुक्यातील वाढती वीज ग्राहक संख्या, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अपुरे मनुष्यबळ, तांत्रिक अडचणी आणि महावितरण व्यवस्थेतील कमतरता यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या दालनात आमदार किसन वानखेडे यांच्या अध्यक्षतेत महावितरण अधिकाèयांची आढावा बैठक पार पडली. बैठकीत वीजपुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत आ. किसन वानखेडे यांनी उमरखेड शहरातील वाढती लोकसंख्या आणि वीज ग्राहकांची संख्या लक्षात घेता महावितरणचे विद्यमान कार्यक्षेत्र अपुरे पडत असल्याचे स्पष्ट केले. शहरातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी उमरखेड शहराचे स्वतंत्र दोन विभाग करण्यात यावेत, त्यासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.तसेच काही वर्षांपूर्वी उमरखेड येथील महावितरणचे महत्त्वाचे स्टोअर पुसद येथे हलविण्यात आल्याने तांत्रिक बिघाड किंवा आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक साहित्य मिळण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे पुसदला हलविण्यात आलेले स्टोअर पुन्हा उमरखेड येथे सुरू करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.यावेळी शहर व ग्रामीण भागातील जुने फीडर, जीर्ण वीजवाहिन्या, अपुèया क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि वाढत्या ग्राहकसंख्येच्या तुलनेत कमी असलेले मनुष्यबळ यामुळे वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
ग्रामीण भागातील फीडर स्वतंत्र करणे, जुन्या डीपी बदलणे, उपकेंद्रांची क्षमता वाढविणे तसेच नवीन तांत्रिक कर्मचारी नियुक्त करण्याची आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले. आ. वानखेडे यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व वीजवाहिन्या परिसरातील झाडांची छाटणी, तांत्रिक दुरुस्ती, आवश्यक साहित्याचा साठा आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना अधिकाèयांना दिल्या. वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्ती करून नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.बैठकीला उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, पुसद विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण, महेश काळेश्वरकर तसेच उमरखेड महागाव मतदारसंघातील महावितरणचे संबंधित अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते.
वीजमंत्र्यांनी दखल घेण्याची अपेक्षा
उमरखेडमध्ये वाढत्या ग्राहकसंख्येमुळे महावितरणच्या यंत्रणेवर ताण निर्माण झाला असून शहराचे विभाजन, स्वतंत्र अधिकारी-कर्मचारी नियुक्ती आणि स्टोअरची पुनर्स्थापना या मागण्या आता अधिक तीव्र झाल्या आहेत. या मागण्यांची राज्याचे ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उमरखेड-महागाव परिसरातील लाखो वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.