दांबुला,
vaibhav suryavanshi भारतीय क्रिकेटला आणखी एक युवा सुपरस्टार मिळाल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. अवघ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने दांबुला येथे खेळल्या गेलेल्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध खेळताना त्याने अविश्वसनीय फटकेबाजी करत विक्रमांची नोंद आपल्या नावावर केली. इंडिया ‘अ’ संघाकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. श्रीलंकेच्या गोलंदाजांवर तुटून पडत त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या फटक्यांपुढे प्रतिस्पर्धी गोलंदाज पूर्णपणे हतबल दिसले. अवघ्या ११ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत वैभवने लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासात नवे पर्व लिहिले.

विशेष बाब म्हणजे, वैभवने आपले अर्धशतक केवळ चौकार आणि षटकारांच्या जोरावर पूर्ण केले. एकही धाव धावत न घेता त्याने ५० धावांचा टप्पा पार केला, ही बाब अधिकच खास ठरली. या खेळीमध्ये त्याने पाच चौकार आणि पाच षटकारांची आतषबाजी केली. या दमदार खेळीमुळे वैभव सूर्यवंशी आता लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या कौशल्या वीरारत्ने यांच्या नावावर होता. त्यांनी २००५ मध्ये अवघ्या १२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. वैभवने तो विक्रम मोडत इतिहास घडवला.
याशिवाय, वैभवने भारताचा विक्रमही आपल्या नावावर केला. याआधी सरफराज खानने विजय हजारे ट्रॉफीत १५ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकत भारतीय विक्रम केला होता. आता हा विक्रम वैभवच्या नावावर जमा झाला आहे. वैभव सूर्यवंशीला सर्वात जलद लिस्ट ए शतकाचा विक्रम मोडण्याचीही संधी होती. मात्र तो थोडक्यात हुकला. हा विक्रम सध्या ऑस्ट्रेलियाच्या जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या नावावर असून त्याने २९ चेंडूंमध्ये शतक झळकावले आहे. या शानदार खेळीनंतर वैभव सूर्यवंशीकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावरही त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतीय क्रिकेटसाठी हा युवा फलंदाज भविष्यात मोठा गेमचेंजर ठरू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.