पाण्यात योगासने करून आरोग्याचा संदेश

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
वाशीम,
Water yoga १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग तथा जलतरण प्रेमी मयुर गणेशराव राऊत व डॉ. प्रशांत गजानन वानखेडे यांच्या पुढाकाराने वाशीम येथे जलयोग या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध वयोगटातील योगप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
 
 

Water yoga
सहभागी योगप्रेमींनी पाण्यात ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, भुजंगासन यांसारख्या सोप्या योगासनांसह विविध प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी योगाचे महत्त्व विषद करताना योग तथा जलतरण प्रेमी मयुर गणेशराव राऊत यांनी सांगितले की, यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची निरोगी वृद्धत्वासाठी योग ही संकल्पना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आरोग्य, तंदुरुस्ती आणि मानसिक संतुलन राखण्याचा संदेश देते. जलयोगामुळे शरीराचा समतोल राखण्यास, लवचिकता वाढविण्यास तसेच मानसिक एकाग्रता वृद्धिंगत करण्यास मदत होते. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती टिकून राहते, तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. तसेच हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांपासून बचाव करण्यास योग उपयुक्त ठरतो. योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी एक परिपूर्ण जीवनपद्धती असल्याचेही त्यांनी नमूद केले. विशेषतः वाढत्या वयात निरोगी, सक्रिय आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मयुर राऊत यांनी यावेळी सांगितले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या जलयोग उपक्रमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक वेगळी ओळख मिळवून दिली. सहभागी योगप्रेमींनी जलयोगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देत योगाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविले.