मुस्लिम देशांत याेग व सूर्यनमस्कार ; मराठी राजदूताचा असाही प्रभावी प्रचार!

साैदी राजपुत्राने वाटल्या पाच हजार प्रती

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
अभिजित वर्तक
नागपूर
 yoga-day-special l
याेगासन, प्राणायाम व सूर्यनमस्कारांच्या बळावर साैदी अरबच्या राजपुत्राची शारीरिक, मानसिक व्याधी दूर करून त्याला नैराश्यातून बाहेर काढण्याचे कार्य एका मराठी राजदूताने 1960 च्या दशकात केले हाेते. एवढेच नव्हे तर या राजदूताच्या अफाट प्रयत्नांमुळेच साैदी अरबसह इजिप्त, सीरिया आणि इतर मध्य पूर्वेतील कट्टर इस्लामी देशांमध्ये याेगासने आणि सूर्यनमस्कारांचा वेगाने प्रसार व प्रचार झाला ही वस्तुस्थिती आहे. त्या राजदूताचे नाव आहे बॅरिस्टर परशुराम भवानराव ऊफर् अप्पासाहेब पंत. अप्पासाहेब पंत हे प्रख्यात औंध संस्थानच्या पंतप्रतिनिधी घराण्यातील व्यक्ती हाेते. भारतीय विदेश सेवेची (आयएफएस) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अप्पासाहेब पंत यांची राजनैतिक मुत्सद्दी (डिप्लाेमॅट) म्हणून नियुक्ती केली. त्यांनी इजिप्त, साैदी अरब, इराक आणि जाॅर्डन या मध्य पूर्वेतील देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून अत्यंत यशस्वी कामगिरी बजावली.
  
yoga
 
yoga-day-special आधुनिक सूर्यनमस्कारांची रचना करून त्याचा जगभर प्रसार करणारे औंध संस्थानचे राजे भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी (बाळासाहेब पंत) यांचे अप्पासाहेब पंत हे सुपुत्र हाेते. वडिलांकडूनच त्यांना याेगासने आणि सूर्यनमस्कारांचे बाळकडू मिळाले हाेते.
 
yoga-day-special अप्पासाहेब पंत साैदी अरबमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत असताना प्रत्यक्ष घडलेली ही गाेष्ट आहे. साैदी राजघराण्यातील एक तरुण राजपुत्र (काही संदर्भांनुसार हा राजपुत्र साैदीचे तत्कालीन राजे ‘इब्न साैद’ यांच्या मुलांपैकी एक किंवा त्यांचा जवळचा नातेवाईक हाेता) गंभीर शारीरिक आणि मानसिक व्याधीने अर्थात नैराश्य आणि अतिताणाने ग्रस्त हाेता. अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये उपचार करूनही त्याला आराम मिळत नव्हता. अप्पासाहेब पंत यांच्या उत्तम आराेग्याचे आणि अफाट ऊर्जेचे रहस्य त्यांच्या नियमित सूर्यनमस्कार घालण्याच्या सवयीमध्ये हाेते. जेव्हा साैदीच्या राजघराण्याला याविषयी समजले, तेव्हा राजपुत्राला डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अप्पासाहेब पंतांची मदत घेतली. अप्पासाहेबांनी काेणत्याही धार्मिक अभिनिवेशाशिवाय, केवळ ‘एक उत्तम शारीरिक व मानसिक व्यायाम’ म्हणून राजपुत्राला शास्त्राेक्त पद्धतीने सूर्यनमस्कार शिकवले. काही महिने नियमित सराव केल्यावर राजपुत्राची शारीरिक कार्यक्षमता सुधारली आणि त्याची मानसिक व्याधीही पूर्णपणे बरी झाली.
सुरुवातीला सूर्यनमस्काराला केवळ ‘हिंदू उपासना’ समजून तिथल्या काही घटकांकडून विराेध दर्शवला जात हाेता. मात्र, अप्पासाहेबांनी वैज्ञानिक दृष्टिकाेन समाेर ठेवून त्याचे महत्त्व पटवून दिल्यामुळे साैदी अरब आणि इजिप्तमधील प्रतिष्ठित वर्गाने या व्यायाम पद्धतीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
yoga-day-special अप्पासाहेब पंत यांनी लिहिलेल्या सूर्यनमस्कारांच्या इंग्रजी पुस्तकाचे आणि त्यांच्या वडिलांनी (बाळासाहेब पंतप्रतिनिधी) तयार केलेल्या संहितेचे साैदी राजपुत्राने अरबी भाषेत हुबेहूब भाषांतर करवून घेतले व त्याच्या 5,000 प्रतींचे प्रकाशन करून त्या माेफत वाटल्या. पाश्चात्त्य वैद्यकशास्त्र अपयशी ठरले असताना केवळ एका भारतीय व्यायाम पद्धतीमुळे आपला शारीरिक व मानसिक आजार दूर झाला, या कृतज्ञतेपाेटी त्या राजपुत्राने हा निर्णय घेतला. या पुस्तकात सूर्यनमस्कारांची सर्व स्थिती, त्यांचे शरीराच्या विविध अवयवांवर हाेणारे परिणाम आणि श्वासाेच्छ्वासाची पद्धत अत्यंत साेप्या पद्धतीने अरबी भाषेत समजावून सांगण्यात आली हाेती.