विघ्नहर्ता योगनृत्य परीवारातर्फे योगदिन साजरा

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे, 
नागपूर,
yoga-day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विघ्नहर्ता योगनृत्य परिवाराच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मोठ्या संख्येने नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक-युवती या उपक्रमात सहभागी झाले होते. योगाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 
 

yog 
 
 
विघ्नहर्ता योगनृत्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक डॉ. बबनराव गांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २०० प्रशिक्षणार्थ्यांनी योगनृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. सकाळी साडेपाच वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रारंभी सर्वांनी एकत्रितपणे ‘मानसाने मानसासम वागणे’ ही योग वंदना सादर करून मानवतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला. यानंतर डॉ. बबनराव गांजरे, सहायक प्रशिक्षक महादेव तोंडरे आणि अरुण राऊत यांच्या नेतृत्वात विविध योगासने, प्राणायाम तसेच योगनृत्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांनी तालबद्ध पद्धतीने योगनृत्य सादर करत योग आणि कला यांचा सुंदर संगम घडवून आणला. या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
 
 
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गांजरे म्हणाले की, “योग ही केवळ शारीरिक व्यायामपद्धती नसून जीवन जगण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहते, मानसिक तणाव कमी होतो आणि मन सकारात्मक बनते. आजच्या धावपळीच्या जीवनात योगाची गरज अधिक वाढली असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे आवश्यक आहे.”
 
 
ते पुढे म्हणाले की, “योगसाधनेमुळे मानसिक स्वास्थ्य कायम निर्मळ राहते. मन, बुद्धी आणि शरीर यांचा समतोल राखण्यास योग मदत करतो. विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी तसेच निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी योग हा प्रभावी मार्ग आहे.”
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व, प्राणायामाचे फायदे, तणावमुक्त जीवनासाठी योगाची भूमिका तसेच आरोग्यदायी जीवनशैलीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींचे आभार मानण्यात आले आणि योगाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान परिसर योगमय वातावरणाने भारावून गेला होता. सहभागी नागरिकांनी अशा आरोग्यवर्धक उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षाही व्यक्त केली.