रस्त्यावरील खड्ड्यांत बसून युवकांनी केला ‘योग’

- अर्जुनी - महागाव - बोरी मार्गाच्या दुरुस्तीसाठी अनोखे आंदोलन

    दिनांक :21-Jun-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
yoga-in-potholes-on-the-road : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभर विविध ठिकाणी योगासने करून आरोग्याचा संदेश दिला जात असताना, मोरगाव येथील राजे छत्रपती ग्रुप युवा मोर्चाच्या युवकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. अर्जुनी शहरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील अर्जुनी-माहूरकुडा-महागाव-बोरी मार्गावरील खड्ड्यांमध्ये बसून युवकांनी योगासने करत योग दिन साजरा केला.
 
 
 
yoga
 
 
 
अर्जुनी-मोरगाव-माहूरकुडा-महागाव-बोरी हा मार्ग मागील अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर बैलगाडी चालविणेही कठीण झाले असून, अनेक लहान-मोठे अपघात या मार्गावर घडले आहेत. स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा प्रशासनाकडे निवेदने सादर केली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. दिवसेंदिवस रस्त्याची दुरवस्था अधिकच वाढत असून आगामी शैक्षणिक वर्षात शाळकरी मुलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राजे छत्रपती ग्रुप युवामोर्चाने खड्ड्यांमध्ये बसून योगासने करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा स्थानिक नागरिकांच्या सहभागातून यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवकांनी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीची कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.