‘ग्राम चिकित्सालय २’ मध्ये रंगणार प्रेमकथा

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
मुंबई,
gram chikitsalay 2 ओटीटीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये स्थान मिळवलेल्या ‘ग्राम चिकित्सालय’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे. पहिल्या सीझनमध्ये ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव मांडत या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता नव्या सीझनमध्ये कथा अधिक भावनिक, रंजक आणि नातेसंबंधांच्या गुंतागुंतीकडे वळताना दिसणार आहे.
 
gram chikitsalay 2
 
या सीझनमधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे गार्गी आणि प्रभात यांच्यातील नाते. पहिल्या सीझनमध्ये दोघांमधील सूक्ष्म केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या नात्यात एक वेगळी ओढ जाणवत होती, मात्र त्याला स्पष्ट रूप देण्यात आले नव्हते. आता दुसऱ्या सीझनमध्ये त्यांच्या नात्याचा प्रवास अधिक स्पष्टपणे समोर येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गार्गीची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षा रंजन कपूरने या सीझनबद्दल बोलताना सांगितले की, गार्गी आणि प्रभात यांच्यातील नाते चित्रीकरणादरम्यान नैसर्गिकरीत्या विकसित झाले. पहिल्या भागात फक्त त्यांच्या भावनांची झलक दिसली होती, पण आता कथा अधिक खोलवर जाणार आहे. दोघांमधील संवाद, भावना आणि नात्यातील बदल प्रेक्षकांना विशेष भावतील, असा विश्वास तिने व्यक्त केला.
मालिकेच्या निर्मात्यांनी यावेळी कथानकात भावनिक स्तर अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ग्रामीण जीवनातील वास्तवासोबतच मानवी नात्यांची उब आणि गुंतागुंतही प्रभावीपणे पाहायला मिळणार आहे. ‘ग्राम चिकित्सालय २’मध्ये अमोल पराशर, आकांक्षा रंजन कपूर, विनय पाठक, आकाश मखिजा आणि इतर कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ही मालिका २३ जूनपासून प्रेक्षकांसाठी ओटीटीवर उपलब्ध होणार असून, नव्या सीझनबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.