रिसोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मध्यरात्री तलवारीसह संशयित ताब्यात वाहन व मोबाईलसह मुद्देमाल जप्त

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
रिसोड, 
action-by-risod-police : पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या धाडसी कारवाईत धारदार तलवार बाळगणार्‍या एका संशयितास ताब्यात घेत त्याच्याकडून तलवार, कटर, मोबाईल व दुचाकीसह मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध शस्त्र बाळगणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. रात्री सुमारे १ वाजता दरम्यान पोलिस स्टेशन रिसोडच्या डी. बी. पथकाला वाशीम नाका परिसरातील मुंदडा कॉम्प्लेक्स येथे तीन इसम अंधारात धारदार शस्त्रे घेऊन संशयास्पदरीत्या थांबले असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोनि रमेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथक घटनास्थळी दाखल झाले.
 
 

JKL 
 
 
 
पोलिसांनी सापळा रचताच तिन्ही संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून एका इसमाला ताब्यात घेतले, तर दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पकडलेल्या इसमाने आपले नाव शामराव शिवाजी काळे (वय २४) रा. साकळा प्लॉट, परभणी असे सांगितले. त्याच्या अंगझडतीत एक लोखंडी तलवार, स्टील कटर, विवो कंपनीचा मोबाईल व पल्सर दुचाकी असा मुद्देमाल आढळून आला. तसेच घटनास्थळावरून पसार झालेल्या संशयितांचा एक फायबर लाईटर पिस्तूल व ओप्पो कंपनीचा मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केला. चौकशीदरम्यान पकडलेल्या आरोपीने आपल्या साथीदारांची नावे अनिल उत्तम काळे (रा. परभणी व रमेश किशन काळे (रा. निजामपूर, रिसोड अशी असल्याचे सांगितले. मात्र, ते तिघेही त्या ठिकाणी का थांबले होते याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे थांबले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आरोपींविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिपोअ निखिल खाटमोडे, अपर पो. अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात डी. बी. पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.