अंबाजोगाई
Ambajogai Violence Case अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदत करणे ही मानवी मूल्यांची ओळख मानली जाते. मात्र अंबाजोगाईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने हीच मदत एका तरुणाच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. पूर्वीच्या भांडणात मध्यस्थी करून दोघांमध्ये शांतता निर्माण करणाऱ्या तरुणावरच वर्षभरानंतर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला आहे.
शशिकांत सुधाकर माने असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंबेफळ येथील रहिवासी परमेश्वर बाबुराव शिंपले (वय ३५) यांच्या भाच्याला, कल्याण भास्कर दंडवते याला सुमारे वर्षभरापूर्वी अंबा साखर कारखान्याजवळ काही जणांनी अडवून मारहाण केली होती. त्यानंतर काही दिवसांनी सातेफळ शिवारातील शेताजवळ पुन्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्या वेळी शशिकांत माने याने मध्यस्थी करून भांडण सोडवत मित्राला वाचवले होते.
याच मध्यस्थीचा राग आरोपींच्या मनात कायम राहिला आणि त्यातूनच पूर्ववैमनस्यातून बदला घेण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. काल दुपारी साडेचारच्या सुमारास कुंबेफळ परिसरातील जयप्रभा शाळेजवळ आरोपींनी शशिकांत माने याला गाठले आणि अचानक हल्ला केला.
आरोपी अशोक मुकुंद मोरे, Ambajogai Violence Case सैपान उर्फ सोपियान शेख, किशोर उर्फ कृष्णा मुंडे आणि रितेश चव्हाण यांनी शशिकांत माने याला बॅटने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याच्यावर धारदार तलवारीने वार करण्यात आले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “भलाईचा जमाना राहिला नाही” अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मध्यस्थी करून भांडण मिटवणाऱ्या तरुणावरच झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.