तभा वृत्तसेवा
वणी,
ambulance-catches-fire : तालुक्यातील कोलार-पिंपरी मार्गावर रविवारी दुपारी झालेल्या अपघातात एका रुग्णवाहिकेला भीषण आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत वाहनाबाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. तसेच रुग्णवाहिकेत कोणताही रुग्ण अथवा कर्मचारी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास रुग्णवाहिका कोलार-पिंपरी मार्गावरून जात असताना ब्राह्मणी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रुग्णवाहिका रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन जोरदार आदळली. अपघातानंतर काही क्षणांतच वाहनातून धूर निघू लागला आणि अचानक आग भडकली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ वाहनाबाहेर उडी मारत स्वतःचा जीव वाचविला. काही वेळातच आगीने संपूर्ण रुग्णवाहिकेला वेढा घातला आणि वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वेगाने पसरल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, रुग्णवाहिकेला आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसून अपघातामुळे आग लागली की तांत्रिक बिघाडामुळे आग भडकली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.