कारंजा लाड,
anupam-kher : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ, बहुआयामी आणि लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते अनुपम खेर यांनी आज, २२ जून रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान येथील एसबी फुड कोर्ट अँड गेम झोनला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे शहरातील नागरिक, चाहते आणि व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, दिवसभर या भेटीची चर्चा रंगली.
शहरातील एसबी फुड कोर्ट अँड गेम झोनमध्ये पोहोचल्यानंतर अनुपम खेर यांनी येथील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. गेल्या अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे अनुपम खेर यांनी शेकडो चित्रपट, मालिका आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये काम केले आहे. अशा दिग्गज कलाकाराने दिलेली भेट शहरासाठी गौरवास्पद मानले जात आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या भेटीमुळे कारंजा शहराला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळण्याची संधी प्राप्त झाली असून, हा दिवस शहराच्या स्मरणात कायम राहणारा ठरला आहे.