आर्वी,
amar-kale : येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील जुन्या जलपुरवठा योजनेतील इंग्रजकालीन जलवाहिनी चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.
शहरातील जुनी जलवाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे नगरपरिषदेकडून नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असून सध्या नवीन जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, जुन्या जलवाहिनीतील पाइप जमिनीतच होते. इंग्रजकालीन या पाइपलाईनमध्ये तांबे, पितळ, कांस्य यांसारख्या मौल्यवान धातूंचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. त्यामुळे या जलवाहिनीला ऐतिहासिक तसेच आर्थिकदृष्ट्या मोठे महत्त्व होते. अशा मौल्यवान जलवाहिनीची चोरी झाली. या संदर्भात खा. काळे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तसेच या चोरीप्रकरणामागे राजकीय आश्रय असलेल्या काही भंगार व्यावसायिकांचा हात असल्याची माहिती प्राप्त झाल्याचेही खासदार काळे यांनी नमूद केले आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील भंगार साहित्यही अशा काही भंगार व्यावसायिकांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याच्या तक्रारी समोर येत असून यामुळे शासकीय मालमत्तेची मोठ्या प्रमाणात लूट झाल्याचा संशय व्यत करण्यात येत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी खा. काळे यांनी केली आहे.