अनिल कांबळे,
नागपूर,
sex-racket : बजाजनगर चौकासारख्या नेहमी गजबजलेल्या वस्तीत प्रयाग एनक्लेव इमारतीत फेअर लक्झरी नावाने ‘मसाज-स्पा’ सुरु होता. या स्पामध्ये चार तरुणींकडून चक्क देहव्यापार करवून घेण्यात येत होता. या स्पावर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा घातला. आंबटशौकीन ग्राहकांसोबत तरुणी ‘नको त्या अवस्थेत’ आढळल्या. या प्रकरणी स्पा व्यवस्थापकाला अटक केली. तर स्पाचे दोन्ही मालक फरार झाले. अमन नामदेवराव वैद्य (वय २८ वर्षे, रा. आकार बिल्डींग, बैरामजी टाऊन, सदर) असे अटकेतील दलालाचे नाव आहे. सुशिलकुमार लोहारीवाल आणि कमलकुमार गोसावी (दोन्ही रा. राऊलकेला, उडिसा) अशी फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाजनगरात महाविद्यालयीन युवक आणि अन्य राज्यातील युवकांची मोठी गर्दी असते. हीच बाब हेरुन अमन वैद्य याने प्रयाग एनक्लेव इमारतीत ‘फेअर लक्झरी’ नावाने स्पा-मसाज सुरु केला होता. येथे त्याने चार तरुणींना मसाज करण्यासाठी ठेवले होते. मात्र, काही दिवसांतच या स्पामध्ये मसाज करणाऱ्यांची अचानक गर्दी वाढायला लागली. रात्री-बेरात्री स्पामध्ये तरुणी आणि तरुणांची गर्दी झाली होती. पोलिसांना संशय आल्यामुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे यांनी गोपनीय माहितीवरुन खात्री केली. सेक्स रॅकेट सुरु असल्याचे लक्षात येताच पंटर पाठवून खातरजमा केली. रविवारी दुपारी या स्पामध्ये बनावट ग्राहक पाठवला. त्याला तेथे वेगवेगळ्या चार तरुणींची भेट घालून देण्यात आली. तीन हजार रुपयांमध्ये सौदा ठरला. दरम्यान, ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी छापा घातला. पोलिसांनी चारही तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. तसेच आरोपी व्यवस्थापक अमन वैद्य याला अटक केली. तर कमलकुमार आणि सुशिलकुमार यांचा शोध सुरु आहे.
चारही तरुणी परराज्यातील
नागपुरात देहव्यापार करण्यासाठी करारावर आलेल्या चारही तरुणी अन्य राज्यातील आहेत. नवी दिल्ली, कोलकाता, मणिपूर आणि मेघालय येथील चारही तरुणी असून त्या महिन्याभरापूर्वीच देहव्यापार करण्यासाठी नागपुरात आल्या होत्या. पीडित तरुणी पदवीधर असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून देहव्यापारात सक्रिय आहेत. त्यांना दिल्लीतील एका दलालाच्या माध्यमातून विमानाने नागपुरात आणण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे.