मुंबई
Divya Agarwal देशभरात सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या घरातील वास्तवाबाबत ‘बिग बॉस OTT’च्या पहिल्या पर्वाची विजेती दिव्या अग्रवाल हिने काही धक्कादायक आणि स्पष्ट खुलासे केले आहेत. एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने घरातील नियम, स्पर्धकांचे दैनंदिन जीवन आणि प्रेक्षकांमध्ये असलेल्या गैरसमजांवर भाष्य केले आहे.
‘बिग बॉस’च्या घरात 24 तास कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली राहावे लागते, त्यामुळे घरात काय घडते याबाबत कायमच उत्सुकता आणि चर्चा असते. याच पार्श्वभूमीवर दिव्या अग्रवालने घरातील काही गोष्टींबाबत पडदा उघडत प्रेक्षकांमध्ये असलेल्या अनेक अफवांना स्पष्ट उत्तर दिले आहे.
दिव्याने सांगितले की, घरातील मूलभूत सोयीसुविधांबाबत अनेक मर्यादा असतात. टोमॅटो केचपसारखी साधी गोष्टही स्पर्धकांसाठी ‘लक्झरी’सारखी वाटते आणि ती सहज उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत स्पर्धकांना अनेकदा छोटे-मोठे ‘जुगाड’ करावे लागतात, असेही तिने नमूद केले.सिगारेटबाबत बोलताना दिव्याने स्पष्ट केले की, या बाबतीत काही प्रमाणात सवलत दिली जाते. स्पर्धकांना त्यांच्या पसंतीचा ब्रँड विचारला जातो आणि त्यानुसार सिगारेट उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, दारूबाबत पसरलेल्या अफवांना तिने पूर्णपणे फेटाळून लावत घरात दारू उपलब्ध करून दिली जात नाही, असे स्पष्ट केले.घरातील खासगी आयुष्याबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरही दिव्याने रोखठोक प्रतिक्रिया दिली. काही प्रेक्षकांकडून अत्यंत विचित्र प्रश्न विचारले जातात, असे सांगताना तिने सांगितले की घरात सर्व काही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली असले तरी स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गैरसमज पसरवले जातात.
या चर्चेदरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांमधील नातेसंबंध किंवा वैयक्तिक घडामोडींवरही तिने सूचक भाष्य केले. काही गोष्टी कॅमेऱ्यासमोर दिसत नाहीत, मात्र पडद्यामागे घडणाऱ्या घटनांबाबत प्रेक्षकांमध्ये कायमच उत्सुकता राहते, असे तिने नमूद केले.दिव्या अग्रवालच्या या खुलाशांनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ शोबाबत चर्चेला उधाण आले आहे. शोमधील वास्तव आणि पडद्यावर दिसणारे चित्र यात किती फरक असतो, यावर प्रेक्षकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.