आर्वी,
kshitija-wankhede : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा निवडणुकीत जिंकल्याबद्दल अॅड. डॉ. क्षीतिजा वडतकर (वानखेडे) यांचा आर्वी विधानसभा महिला आघाडी व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रुणिचा धाम येथे नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार, जिल्हा महामंत्री कमलाकर निंभोरकर, जिल्हा सचिव नीता गजाम, भारत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष शोभा काळे उपस्थित होत्या.
या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे राजकीय परिघाच्या पलिकडे जाऊन आर्वी, आष्टी आणि कारंजा या तालुयांतील वकिली क्षेत्रासह अनेक सामाजिक संस्थांनी एकत्र येत अॅड. क्षीतिजा यांचा सन्मान केला.
सत्काराला उत्तर देताना अॅड. डॉ. क्षीतिजा वडतकर (वानखेडे) म्हणाल्या, निवडून आल्यानंतर अनेक ठिकाणी माझे सत्कार झाले. परंतु, आज माझ्या आर्वीच्या भूमीत, माझ्या हक्काच्या माणसांनी केलेल्या या सत्काराने आपण भारावून गेलो आहोत. हे प्रेम पैशाने विकत घेता येत नाही. आर्वीकरांचे हेच अथांग प्रेम आणि विश्वास आमच्या पाठीशी सदैव राहू द्या, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ न देता कौन्सिलच्या माध्यमातून वकिली क्षेत्रासह सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या. तुला नाही जमणार असा सांगणार्या आवाजाच्या विरोधात आज प्रत्येक स्त्री जिंकली असल्याचे त्या म्हणाल्या. ज्या दिवशी एक स्त्री दुसर्या स्त्रीला साथ देऊ लागेल, ज्या दिवशी तिची लढाई माझी वाटेल, ज्या दिवशी उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे या संकुचित विचाराच्या वर जाऊन आपण विचार करू, त्या दिवशी आपण खर्या अर्थाने प्रगत समाज आणि शिक्षित झालो असं समजू असेही अॅड. क्षीतिजा वानखेडे म्हणाल्या. शुभांगी भिवगडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन ज्योती यावले यांनी तर आभार शुभांगी गाठे यांनी मानले.