कुरखेडा,
pratibha-uike : नगरपंचायत प्रभाग क्रमांक 16 येथील रिक्त जागेकरीता झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी (काँग्रेस-उबाठा) प्रणीत काँग्रेस पक्षाचा प्रतिभा रवि उईके हिने भाजपाच्या निलीमा जयराम हारामी यांचा 18 मतांनी धक्कादायक पराभव केला. एकूण झालेल्या मतदानाच्या 217 मतांपैकी 117 मते प्रतिभा उईके यांना तर भाजपच्या निलीमा हारामी यांना 99 मते मिळाली. तर 1 मत नोटाला मिळाले.
सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये सदर प्रभागात भाजपाच्या गौरी उईके यांचा विजय झाला होता. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनाने सदर जागा रिक्त होती. 20 जून रोजी येथे मतदान प्रक्रिया पार पडली. भाजपाच्यावतीने गौरी उईके यांची कन्या निलीमा हारामी हिला उमेदवारी देण्यात आली होती. तर कांग्रेसच्यावतीने प्रतिभा उईके मैदानात होत्या. पंचवार्षिक कालावधी पूर्ण होण्यास अवघ्या 6 महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना व नवनिर्वाचित सदस्याला अल्पकाळ मिळणार असला तरी पुढील सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी व लिटमस टेस्ट म्हणून दोन्ही गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती.
रविवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रिया पार पडत प्रतिभा उईके यांना विजयी घोषीत करण्यात येताच महाविकास आघाडीचे नेते आमदार रामदास मसराम, उबाठाचे तालुकाप्रमुख आशिष काळे, जयंत हरडे, आशा तुलावी, भावेश मुंगणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने तहसील कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करीत मोठा जल्लोष करण्यात आला.