नागपूर,
Cyber Crime शहरातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी 'सायबर क्लब' स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार सीबीएसईने हा निर्णय घेतला असून, ऑनलाइन फसवणूक, सायबर छळ, ओळख चोरी, आर्थिक फसवणूक आणि सोशल मीडियावरील गैरवापराविषयी विद्यार्थ्यांना लहान वयातच जागरूक करण्यावर भर देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला सायबर जागरूकता दिवस
या निर्देशानुसार नागपूरातील सीबीएसई शाळांमध्ये सायबर सुरक्षा शिक्षणाला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक शाळेतील सायबर क्लब वर्षभर भाषणे, प्रश्नमंजुषा, वादविवाद, पोस्टर स्पर्धा, प्रतिज्ञा मोहीम आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. तसेच प्रत्येक महिन्याचा पहिला बुधवार 'सायबर जागरूकता दिवस' म्हणून पाळण्यात येणार असून, पालक-शिक्षक सभा आणि शाळेच्या विविध उपक्रमांमधूनही सायबर सुरक्षेचा संदेश दिला जाणार आहे.
शाळांना गृह मंत्रालयाच्या 'Cyber Crime इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर'ने तयार केलेले पोस्टर्स, व्हिडिओ, पुस्तिका आणि अन्य जनजागृती साहित्य विद्यार्थी, पालक व शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय 'सायबर हायजीन' प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच सुरक्षित इंटरनेट वापराबाबत प्रतिज्ञापत्र आणि सायबर सुरक्षेवरील कॉमिक पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता नागपूरातील सीबीएसई शाळांमध्ये सायबर सुरक्षेची संस्कृती विकसित करून विद्यार्थ्यांना जबाबदार डिजिटल नागरिक बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.