कतार,
Explosion at Qatar Gas terminal कतारमधील रास लाफान औद्योगिक क्षेत्रात रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. देशातील प्रमुख नैसर्गिक वायू निर्यात टर्मिनलमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. या घटनेत किमान54 जण जखमी झाले असून 18 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गॅस टर्मिनलमध्ये पुन्हा कामकाज सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटानंतर मोठी आग लागल्याने परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. त्यामुळे काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.
कतारच्या ऊर्जा क्षेत्रासाठी रास लाफान आणि बरझान प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूची निर्यात केली जाते. त्यामुळे या स्फोटाचा केवळ कतारवरच नव्हे, तर जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कतारच्या ऊर्जा क्षेत्रावर दबाव वाढला होता. प्रादेशिक संघर्ष आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे काही प्रकल्पांवर परिणाम झाला होता. परिस्थिती सुधारू लागल्यानंतर पुन्हा उत्पादन आणि निर्यात सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्याचदरम्यान ही मोठी दुर्घटना घडली. अधिकाऱ्यांकडून स्फोटामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. प्राथमिक तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा सर्व शक्यतांचा तपास करत आहेत. या दुर्घटनेनंतर कतारच्या औद्योगिक सुरक्षेवर आणि ऊर्जा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच जागतिक बाजारात गॅस पुरवठा आणि किमतींवरही याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.