सिंदीरेल्वे,
farmers-worried : यंदा, मृग आला आणि न बरसताच निघून गेला! पावसाच्या गैर हजेरीमुळे धरणीमाता वाटच पाहत राहिली. पाऊस न आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तथापि, खरीप हंगाम सजविण्यासाठी कास्तकार अजूनही आस लावून आभाळाकडे बघत आहे.
दोन तृतीयांश जून महिना संपला. अद्याप मान्सूनचे आगमन झाले नाही. आज येईल, उद्या येईल,या आशेने बळीराजा दररोज आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. मान्सूनचा प्रवास रखडल्याने सध्या उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून यावर्षी खरीप हंगामात पिकांची पेरणी उशिरा होण्याचे चिन्ह दिसत आहे. शेतकरी आता आकाशाकडे टक लावून बघतो. पण, इंद्रदेवाची नाराजी संपण्याची शयता दिसत नाही.
शेतकर्यांनी पेरणीपूर्व मशागत संपवली. बी-बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करून झाली. परंतु, पावसाने दडी मारल्यामुळे ही तयारी वाया जाण्याची भीती आहे. शेतकरी पहिल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरणीचा मुहूर्त पुढे ढकलावा लागत आहे. दरम्यान, वाढते तापमान आणि सतत वाहणारे उष्ण वारे यामुळे विहिरी, बोरवेल आणि जलस्त्रोतातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. काही शेतकर्यांनी सिंचनाची सोय असल्यामुळे धूळपेरणी केली. परंतु, पाण्याचा साठा अपुरा पडत असल्यामुळे कपाशीचे रोपटे सुकण्याच्या मार्गावर आहेत. हवामानातील अनिश्चितता आणि बदलत्या परिस्थितीमुळे शेतकर्यांची मानसिकता बदलत असून बळीराजा नास्तिक होतांना दिसतो. कृषी विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.