गोंदिया,
house-fire : गोरेगाव तालुक्यातील आंबेतलाव येथील खेमराज पारधी यांच्या घराला अचानक आग लागल्याने जीवनोपयोगी साहित्यासह 1.20 लाख रुपयांची रोकड जळून खाक झाल्याची घटना रविवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत पारधी यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे संपूर्ण कुटूंब उघड्यावर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री जेवण आटोपल्यानंतर पारधी कुटूंब झोपण्याच्या तयारीत असताना अचानक घरात आग लागली. पाहताक्षणी आगीने रौद्ररुप धारण केले. यावेळी शेजारी व गावकर्यांनी पारधी यांच्या घराकडे धाव घेत मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत या आगीत घरातील अन्नधान्य, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे आणि संपूर्ण संसारोपयोगी साहित्य स्वाहा झाले होते. विशेष म्हणजे, या आगीमध्ये घरात ठेवलेले 1 लाख 20 हजार रुपयांची रक्कमही जळून खाक झाली. या घटनेमुळे पारधी कुटूंबावर मोठे संकट कोसळले असून शासनाकडून त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.