चंद्रपुरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

*चारचाकी वाहनावर कोसळले झाड *नागभीड तालुक्यात वीज पडून बैल ठार

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
चंद्रपूर,
heavy-rain : यंदाच्या पावसाळ्यात अगदी पहिल्यांदाच सोमवारी दुपारच्या सुमारास चंद्रपूर महानगरात मेघगर्जना व जोरदार वादळी वार्‍यासह तासभर पाऊस कोसळला. वार्‍याची भीषणता एवढी होती की, महानगरातील अनेक झाडे उन्मळून पडली. तुकूम परिसरातील बियाणी पेट्रोल पंपाजवळ तर एका चारचाकी वाहनावर मोठे झाड कोसळले. कार चकनाचूर झाली. अनेक घरांवरचे टिन उडत बाजूला पडले. विजेचे, करमणुकीचे आणि इंटरनेटचे केबल्स तुटून पडले. रस्त्यावरील घाऊक दुकानदारीची एकच तारांबळ उडाली.
 
 

CHAND 
 
 
 
नागभीड, वरोडा येथे वादळ व मेघर्गजनेसह जोरदार पाऊस बरसला. नागभीड तालुक्यातील जनकापूर येथे गुरांच्या गोठ्यावर वीज पडून बैल ठार झाला. या पावसाने उकाड्यापासून नागरिकांना काहिसा दिलासा दिला आहे. महानगरात सकाळपासूनच कडक उन्ह होते. मात्र दूपारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन 3 वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. अचानक बरसलेल्या या पावसाने नागरिक व छोट्या दूकानदारांची तारांबळ उडाली. तुकूम भागात झाडाखाली आलेल्या कारमध्ये कुणीच नसल्याने सुदैवाने जीवतहानी टळली. मात्र, वाहनाचे नुकसान झाले. तासभर दमदार कोसळल्यानंतर पावसाने 4 वाजता उसंत घेतली. तर नागभीड तालुक्यात दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास वादळ व मेघगर्जनेसह मुसळधार जोरदार पाऊस झाला. यावेळी जनकापूर येथे श्रीराम गुरनुले यांच्या गुरांच्या गोठ्यात बांधलेल्या बैलावर वीज पडली. यात बैल जागीच ठार झाला. नुकसानग्रस्त शेतकर्‍याला शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.
 
 
भद्रावती, कोरपना, बल्लारपूर, गोंडपिपरी येथे पावसाच्या हलक्या सरीही आल्या. तर अन्य तालुक्यात ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाने हजेरी लावली नाही. सध्या शेतकर्‍यांनी शेतात पेरणी केली असून, ते आता समाधनकारक पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, पाऊस सतत हुलकावणी देत असल्याने त्यांच्या चितेंत भर पडली आहे.