अवैध देशी दारूसह 7.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

- सालेकसा पोलिसांची कारवाई; गिरोला-तिरखेडी मार्गावर नाकाबंदी

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
गोंदिया, 
liquor-seized : जिल्ह्यात अवैध दारू विक्री, साठा व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सालेकसा पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणार्‍या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संजय सदाशिव राऊत (50) व गणेश ईश्वर निकोडे (36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
 

liquor-seized 
 
 
 
गुप्त माहितीच्या आधारे सालेकसा पोलिसांनी 21 जून रोजी सालेकसा तालुक्यातील गिरोला-तिरखेडी मार्गावर नाकाबंदी कारवाई केली. यावेळी बोलेरो वाहन क्रमांक एमएच-28 व्ही 4420 ला थांबवून पंचासमक्ष पाहणी केली असता वाहनात अवैधरित्या देशी दारूच्या 6 पेट्या आढळून आल्या. ज्यामध्ये 90 एमएल क्षमतेच्या प्रत्येक पेटीत 100 नग प्रमाणे 6 हजार पाऊच मिळून आले. ज्यांची किंमत 2 लाख 40 हजार रुपये आहे. दरम्यान, पोलिसांनी सदर देशी दारू व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले 5 लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन असा 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.