वर्धा,
rain-wardha : रोहिणी नक्षत्र कोरडे गेले, मृग नक्षत्रही संपले आणि आता आद्रा नक्षत्र सुरू झाले आहे. परंपरेनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात, विशेषतः ७ जूनच्या आसपास पावसाचे आगमन व्हायचे. मात्र, यंदा जून महिना संपत आला तरी अनेक भागांत पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी उकाड्याने नागरिक हैराण झाले असून शेतकर्यांची चिंता वाढली आहे. पाऊस येत नसल्याने समाजमाध्यमांवर मात्र विनोदांचा आणि उपरोधिक पोस्टचा अक्षरशः पाऊस पडत आहे. नेटिझन्सनी आपल्या खास शैलीत पावसाला लक्ष्य करत अनेक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे पावसाचा समाजकारण, राजकारण आणि साहित्यासोबत जुगाड जमवला आहे.
पावसाने डोळे वटारले आहेत. पावसाची गरज प्रत्येकाला आहे. शेतीकरिता तर सर्वात जास्त योग्यवेळी पेरणी न केल्यास पीक साधत नाही, हेही तेवढेच खरे आहे. चांगला पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका अशी विनंती प्रशासकीयस्तरावरून वारंवार केली जात आहे. आता तर कृषी विभागाने घरच्या घरी ट्रेमध्येच कपाशीची लागवड करण्याची युती सांगितली आहे. एकंदरीत या पावसाने आता शेतकर्यांसह प्रत्येकाचा घाम काढणे सुरू केले आहे. चार चौघात पाऊस कधी येईल याच विषयावर चर्चा रंगत आहेत. यात मग नेटकरी तरी कुठे मागे राहलीत. व्हॉट्अॅप विद्यापीठात तर मग पावसाला लाजवल्यागत कॉमेंट् करणे सुरू केले आहे. धोंडी धोंडी पाणी दे ने नाही, प्रार्थनेेने नाही तर किमान या उपरोधीकतेने लाज वाटून पाऊस कोसळेल आणि धरणीमाता तृप्त होईल, अशी भाबडी आशा नेटकरी लावून बसले आहेत. कडून आला की तिकडे हा संदेश पावठवल्या जात असल्याने घामाच्या धारांमध्ये घेतल्या जात आहे. नेटकर्यांनी ट्रोल करीत आमदार फुटले, खासदार फुटले, पेपर फुटले... आता ढग फुटू दे रे देवा! अशी पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल केली आहे. तर सरून चालला जून, कमी होईना ऊन, पाऊस पडेना अजून अशा काव्यात्मक ओळींनीही अनेकांचे लक्ष वेधले आहे.
काहींनी तर पावसाच्या विलंबाची तुलना सरकारी प्रक्रियेशी केली आहे. पावसाची अजून केवायसी झाली नसेल असा टोला मारत पावसालाच कागदपत्रांच्या फेरफटयात अडकवले आहे. जून या शब्दावर आधारित शब्दखेळही समाजमाध्यमांवर चांगलाच गाजत आहे. अर्धा जून महिना गेला, पण ‘अ’जून पावसाचा पत्ता नाही, असे वाटते की ‘भि’जून जावे, ‘मो’जून दोन-चार थेंब पडतात, अंग ‘भा’जून जात आहे, चेहरा ‘कोमे’जून गेलाय, कुठे ‘स’जून जाता येत नाही अशा पोस्टना हजारो लाईस आणि शेअर्स मिळत आहेत.
एकीकडे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत, तर दुसरीकडे समाजमाध्यमांवरील मंडळी विनोदांच्या माध्यमातून उकाड्याचा त्रास हलका करण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण असले तरी मराठी माणसाची विनोदबुद्धी मात्र कोरडी पडलेली नाही, हे या पोस्टमधून दिसून येते.
आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. समाजमाध्यमांवरील विनोदांचा वर्षाव थांबवून खर्या पावसाचा वर्षाव कधी सुरू होतो, याचीच प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. काही असो आता तरी पाऊस येऊ देरे देवा... असे म्हणण्याची वेळ आली आहे.