अनिल कांबळे
नागपूर,
Koradi Police कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका धक्कादायक प्रकरणात सावत्र वडिलांनी आपल्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय आरोपीने युवकाने एका ३५ वर्षीय महिलेशी मैत्री केली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी मंदिरात लग्न केले. नव्याने संसार सुरु झाल्यानंतर त्याची वाईट नजर सावत्र मुलीवर पडली. त्याने तिच्याशी सलगी साधण्याचा प्रयत्न केला. वारंवार तिच्याशी विकृत चाळे करायला लागला. यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत आपल्या राहत्या घरी सावत्र मुलीवर वारंवार अत्याचार केले. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, १४ एप्रिल ते १७ जून दरम्यान आरोपीने दोन ते तीन वेळा तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. हे सर्व प्रकार त्यांच्या राहत्या घरात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अत्याचारानंतर हा प्रकार कोणालाही सांगितल्यास तिच्या आईचा खून करण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे भीतीपोटी मुलगी काही काळ गप्प होती. अत्याचाराचा मानसिक ताण असह्य झाल्यानंतर तिने धैर्य एकवटून संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
पीडित मुलीच्या जबाबाच्या Koradi Police आधारे १९ आणि २० जून रोजी कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात लैंगिक अत्याचारासंदर्भातील भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील संबंधित कलमांसह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गतही तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून त्याला अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पीडितेला आवश्यक समुपदेशन, मानसिक आधार आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून कुटुंबातील विश्वासाच्या नात्यालाच तडा देणाऱ्या या प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.