धारणी,
leopards-rampage : मेळघाटातील वनालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढत असून धुळघाट वन परिक्षेत्रांतर्गत पळसाकुंडी येथे रविवारी रात्री बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पळसाकुंडी येथील शेतकरी राजेश मनोहर इंगळे यांच्या मालकीचे गाईचे वासरू घरालगतच्या गोठ्यात बांधले होते. रविवारी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने गोठ्याजवळ येत वासरावर हल्ला केला. हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला. सकाळी पशुधनाची पाहणी करताना ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच धुळघाट वन परिक्षेत्रातील वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून नुकसानाची नोंद केली. संबंधित पशुपालकाला शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
पळसाकुंडी व परिसरातील गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी बिबट्या गावाच्या हद्दीत प्रवेश करीत असल्याने पशुधनाला धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने गस्त वाढवून बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली आहे.
धुळघाट वनपरिक्षेत्रात मागील एका वर्षात बिबट्यांकडून पशुधनावर हल्ल्याच्या सुमारे पाच घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वन्यप्राणी आणि मानवी वस्ती यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधण्याचे तसेच वनक्षेत्रालगत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.