अन् वर्धेत गाढव पावले; पावसाची हलकी हजेरी

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
वर्धा,
rainfall-in-wardha : रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी शहरासह जिल्ह्यातील काही भागात आज सोमवार २२ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा सुटला असून शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. आद्रा नक्षत्राचे वाहन गाढव आहे अन् पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने गाढव पावले असेच म्हणावे लागेल.
 
 
 
FSF
 
 
 
यंदाच्या तापमानात कमालीची वाढ झाली होती. उन्हाळ्यात अवकाळी पाऊसही पडला नाही. कधी जून महिला येतो आणि पावसाच्या सरी पडतात, याकडे लक्ष लागले होते. परंतु, रोहिणी कोरडे गेले. मृग नक्षत्रात पाऊस येईल, अशी आशा होती. या नक्षत्राचे वाहन बेडूक असल्याने डराव डराव करत पाऊस येईल, असे वाटत होते. शेतकर्‍यांनी जमिनीची सर्व मशागत करून पेरणीसाठी सज्ज केली होती. मृगनक्षत्रात शेतकरी प्रत्येक दिवशी आकाशाकडे टक लावून पाहत होता. मात्र, पावसाचा थांग पत्ताच नव्हता. मृगात तुरळक आलेल्या पावसाच्या सरीत काही शेतकर्‍यांनी पेरणीसुद्धा केली होती. त्यांच्यावरसुद्धा दुबार पेरणीची वेळ आली आहे. आजपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली असून वाहन गाढव आहे. पहिल्याच दिवशी शहरासह जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा पसरला. चातकाप्रमाणे वाट पाहणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतशिवारात चैतन्याचे वातावरण पसरून पेरणीच्या कामाला जोमाने सुरुवात होईल. हिंगणघाट येथे दुपारी ३ वाजताच्या सुमारास तुरळक सरी आल्या.