मुंबई
Love and War Movie Set Accident दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका तंत्रज्ञाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. चंद्रधारी यादव असे मृत तंत्रज्ञाचे नाव असून ही घटना मुंबईतील फिल्मसिटीमध्ये चित्रपटाच्या सुरू असलेल्या चित्रीकरणादरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीन दिवसांपूर्वी हा अपघात घडला. त्या वेळी ‘लव्ह अँड वॉर’चे चित्रीकरण सुरू होते आणि अभिनेत्री आलिया भट्टही सेटवर उपस्थित होती. अपघात झाला तेव्हा आलिया तिच्या भूमिकेचे दृश्य चित्रित करत असल्याचे सांगितले जात आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे सेटवरील वातावरण शोकमग्न झाले.या घटनेनंतर संजय लीला भन्साळी यांच्या प्रॉडक्शन हाऊसने मृत तंत्रज्ञाच्या कुटुंबीयांना ४० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. चंद्रधारी यादव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबाला या कठीण प्रसंगात आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने ही मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) नेही या घटनेची पुष्टी केली आहे. फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नुकसानभरपाईची रक्कम ४० लाख रुपयांवरून ५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी केली. मृत तंत्रज्ञाच्या कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेता अधिक आर्थिक सहाय्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
तिवारी यांनी पुढे सांगितले की, Love and War Movie Set Accident चंद्रधारी यादव हे अत्यंत कुशल आणि मेहनती तंत्रज्ञ होते. त्यांच्या निधनामुळे उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी चित्रपटांच्या सेटवर अधिक कठोर सुरक्षा नियम लागू करणे, तसेच कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांचे योग्य नियमन करणे आवश्यक असल्याची मागणीही फेडरेशनने केली आहे.दरम्यान, ‘लव्ह अँड वॉर’ हा संजय लीला भन्साळी यांच्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाकांक्षी चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या काही वर्षांपासून सुरू असून विविध कारणांमुळे त्याच्या प्रदर्शनात वारंवार विलंब झाला आहे.प्रारंभी हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार होता. त्यानंतर प्रदर्शनाची तारीख २० मार्च २०२६ निश्चित करण्यात आली होती. मात्र निर्मिती प्रक्रियेला लागलेला अतिरिक्त वेळ आणि कलाकारांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पुन्हा एकदा प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.